रशियाचे सैन्य युक्रेनच्या जमिनीवर आता आणखी वेगाने आक्रमण करत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपेक्षा येणारी परिस्थिती भयानक ठरण्याची शक्यता आहे. रशियाने रहिवासी इमारतींवर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले होते. यापेक्षा जास्त हल्ले सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैसे पाठविले आहेत. तसेच फ्रान्सने शस्त्रे पाठविली आहेत. ती वाटेत असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे हे युद्ध दोन्ही बाजुंनी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील या तणावपूर्ण परिस्थितीत अद्यापही अनेक भारतीयविद्यार्थी हे अडकून राहिले आहेत.
भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकार देखील पावलं उचलत आहेत. याच दरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याने मदतीसाठी साद घातली आहे. "ब्रेडचा एक तुकडा उरलाय, बंकरमध्ये हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला" असं त्याने म्हटलं आहे. असोयुन हुसैन असं या भारतीय विद्यार्थ्याचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. बंकरमध्ये अडकून राहिलेल्यांची नेमकी कशी परिस्थिती आहे याची त्याने माहिती दिली आहे. एका न्यूज एजन्सीसोबत फोनवर चर्चा करताना हुसैन याने "युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जेवण आणि औषधं मिळणं अत्यंत कठीण झालं आहे कारण येथे स्थानिक लोकांना प्राथमिकता दिली जात आहे."
"पिण्याच्या पाण्यासाठी देखील अनेक तास पाहावी लागतेय वाट"
"बंकरमध्ये तापमान इतकं खाली गेलं आहे की बर्फ जमा झाला आहे. गेल्या 48 तासांत आमच्याकडे खाण्यासाठी फक्त ब्रेडचा एक छोटासा तुकडा उरला आहे. जेवण तर लांबची गोष्ट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील अनेक तास वाट पाहावी लागत आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बंकरमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आमचं जॅकेट देखील खराब झालं आहे. थंडी इतकी आहे की नेमकं काय करावं हे समजत नाही. आमच्याकडे 4-5 बेडशीट होत्या. आम्ही त्यावरच रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मवर झोपत आहोत" असं असोयुन हुसैन याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट; WHO ने व्यक्त केली भीती
युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती आहे. युद्ध पेटलेलं असताना आता आणखी एक नवीन मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील भीती व्यक्त केली आहे. युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, कीव्हसह इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमध्ये 600 रुग्णालये आहेत. तेथे अजूनही 1700 कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांव्यतिरिक्त युक्रेनमधील नवजात, गर्भवती महिला आणि वृद्धांनाही वेळोवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते.