Ukraine Russia War: मागण्या मान्य केल्या तरच चर्चा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या 'या' तीन अटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 09:00 AM2022-03-05T09:00:43+5:302022-03-05T09:01:12+5:30
गेल्या ९ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं.
Ukraine Russia War: गेल्या ९ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. युक्रेनमधील शहरांवर बॉम्ब टाकले जात असल्याच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. तसंच आपण चर्चेसाठीही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. युक्रेनच्या शहरांवर बॉम्ब टाकत असल्याचं वृत्त निराधार असल्याचं रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिननं सांगितलं.
पुतीन यांचे हे वक्तव्य जर्मनीचे चांसलर ओलाफ सोल्झ यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान आले आहे. युक्रेनची राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्यांच्या बातम्या हा मोठा अपप्रचार असल्याचे पुतीन यांनी म्हटलं आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनवर चर्चा शक्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. युक्रेनियन बाजू आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला असल्याची पुष्टी पुतीन यांनी केली. मात्र रशियाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जाण्याची अट असल्याचं क्रेमलिननं म्हटलंय.
#BREAKING Blinken says US, EU must sustain pressure on Russia "until the war is over" pic.twitter.com/sRkl7oUzdQ
— AFP News Agency (@AFP) March 4, 2022
यामध्ये प्रामुख्यानं तटस्थ आणि अण्वस्त्र नसलेला देश होणं, त्यांच्याद्वारे क्रिमियाला रशियाचा भाग मानणं आणि पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व यांचा समावेश आहे. युक्रेन सरकार तर्कसंगत आणि सकारात्मक दृष्टीकोन दर्शवेल अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली. कीव वार्ताकारांच्या मते, दोन्ही बाजूंमधील चर्चेची पुढील फेरी आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत, तरीही या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्याचा दावा
दुसरीकडे, रशियन संसदेच्या स्पीकर ड्यूमा यांनी दावा केला आहे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देश सोडून पोलंडला गेले आहेत. मात्र, याबाबत युक्रेनच्या प्रशासनाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची ऑफर फेटाळली होती. तसंच मदत करायची असेल तर शस्त्रे द्या. त्यांना देश सोडण्यासाठी कोणत्याही वाहनाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.