नवी दिल्ली - युक्रेनमधील तणावपूर्ण परिस्थितीत अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी हे अडकून राहिले आहेत. भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकार देखील पावलं उचलत आहेत. याच दरम्यान युद्धातही माणुसकी दाखवणारी एक घटना समोर आली आहे. एका भारतीय तरुणाने पाकिस्तानी मुलीचा जीव वाचवला आहे. तिला सुखरूपरित्या रोमानिया बॉर्डरवर पोहोचलं आहे. पाकिस्तानी दूतावासाने अंकितचं भरभरून कौतुक केलं आहे. "भारतीय असलेल्या अंकितने आमच्या मुलीला आमच्याकडे आणलं आणि आमची मुलगी वाचली आहे. बेटा! खूप खूप धन्यवाद. दोन्ही देशातील जनतेने एकमेकांचे पाय खेचण्याची नाही, तर प्रेम आणि पाठिंबा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या द्वेषापेक्षा आपली मुलं महत्त्वाची आहेत" असं म्हटलं आहे.
दैनिक भास्करने अंकितशी संवाद साधला असता त्याने याबाबत माहिती दिली आहे. "25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता इन्स्टिट्यूट तीन किलोमीटर अंतरावर स्फोट झाला." जवळपास 80 विद्यार्थ्यांना बंकरमध्ये पाठवण्यात आलं. त्यात मी एकमेव भारतीय होतो. तिथे मारिया ही पाकिस्तानी मुलगी देखील होती. ती खूप घाबरलेली. आजूबाजूला सतत स्फोट झाल्यानंतर मी तेथून निघण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मारियाला माझ्या बाहेर पडण्याची माहिती मिळाली तेव्हा तिनेही सोबत येण्याची विनंती केली. तिच्या कुटुंबियांशी फोनवर बोलणं झालं आणि 28 फेब्रुवारीला आम्ही दोघं पायी चालत कीव्हच्या बुगजाला रेल्वे स्टेशनला निघालो. दोन दिवसांपासून काही खाल्ले नव्हते. तिला चालता येत नव्हतं. मी तिचं सामान घेतलं आणि गोळीबार टाळण्यासाठी 5 किमी पायी चालत स्टेशनवर पोहोचलो. तिथे खूप गर्दी होती. तीन ट्रेन मिस झाल्या" असं अंकितने म्हटलं आहे.
"खिडकीतून आलेली एक गोळी आमच्या डोक्यावरून गेली"
अंकितने सांगितलं की, "त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता तो कसा तरी ट्रेनमध्ये चढला. तासाभराच्या प्रवासानंतर ट्रॅकच्या बाजूला मोठा स्फोट झाला. गोळीबार सुरू झाला. खिडकीतून आलेली एक गोळी आमच्या डोक्यावरून गेली. ट्रेनमधील सर्वजण श्वास रोखून खाली वाकले. शेवटी 1 मार्चला टर्नोपिल स्टेशनला पोहोचलो. तेथे मारियाचा पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. अधिकाऱ्यांनी आम्हाला टर्नोपिल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात ठेवले. आमच्यासाठी कॉफी, ब्रेड, सूपची व्यवस्था केली."
"बस चालकाने आम्हाला 15-20 किमी अगोदरच सोडले"
"आम्हाला दोघांनाही पाकिस्तान दूतावासाने स्वखर्चाने टर्नोपिल ते रोमानिया बॉर्डरवर बसने पाठवलं. बस चालकाने आम्हाला 15-20 किमी अगोदरच सोडले. तिथून पायी चालत सीमेपर्यंत जायचे होते. ते सीमेवर पोहोचले तेव्हा हजारो लोक होते. आतापर्यंत आम्हाला रोमानिया कॅम्पमध्ये प्रवेश मिळालेला नाही. मी बुधवारपासून भारतीय दूतावासाशी संपर्क साधत आहे पण प्रतिसाद मिळत नाही. मायनस तापमान आहे. मला ताप आहे आणि माझे शरीर खूप दुखत आहे. अद्याप कोणतीही वैद्यकीय मदत मिळालेली नाही. स्थानिक लोक विद्यार्थ्यांना मदत करत आहेत" असं देखील अंकितने म्हटलं आहे. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे.