रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नका, अशी भारताला आणि जगाला तंबी देणारा अमेरिकाचरशियाचे कच्चे तेल आधीपेक्षाही मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे. रशियानेच याची माहिती दिली आहे.
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपसचिव मिखाईल पोपोव्ह यांनी रविवारी रशियन मीडियाला सांगितले की, गेल्या आठवड्यात अमेरिकेने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी ४३ टक्क्यांनी वाढवली आहे. म्हणजेच अमेरिका रशियाकडून दररोज एक लाख बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाची खरेदी करत आहे.
चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, रशियन अधिकाऱ्याने सांगितले की, युरोपने अमेरिकेकडून अशाच 'आश्चर्यजनक वृत्ती'ची अपेक्षा केली पाहिजे. 'याशिवाय, अमेरिकेने आपल्या कंपन्यांना रशियाकडून खते खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू म्हणून त्यास मान्यता दिली आहे, असा दावा केला आहे.
कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूसाठी युरोप रशियावर अवलंबून आहे. हे माहिती असून देखील अमेरिका आणि त्याचे युरोपीय मित्र देश रशियन तेलावर निर्बंध लादत आहेत. रशियन तेलावर निर्बंध लादण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही देशांवर दबाव आहे. ब्रिटनने रशियन तेलावरील आपले अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करण्याची घोषणा केली आहे. तर अमेरिकेने 22 एप्रिलपर्यंत रशियाकडून तेल आणि कोळशाची आयात बंद करणार असल्याचे म्हटले आहे.
असे असले तरी अमेरिका रशियाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल का खरेदी करत आहे, हा प्रश्नच आहे. रशियाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वस्तातील कच्चे तेल खरेदी करायचे, आंतरराष्ट्रीय बाजारात तुटवडा निर्माण करायचा आणि ते तेल भारतासारख्या, युरोपमधील देशांना विकायचे, असा अमेरिकेचा कट असण्याची शक्यता आहे. चिनी तज्ज्ञ कुई हेंग यांनी सांगितले की, रशियाकडून अधिक तेल विकत घेऊन अमेरिकेला तेलाच्या बाजारावर नियंत्रण ठेवायचे आहे. देशांतर्गत हितसंबंध जपण्यासाठी अमेरिका रशियन तेल स्वस्त दरात विकत घेते आणि युरोपला चढ्या किमतीत विकते. शेवटी, युरोप त्याचा बळी ठरत आहे. युरोपचा पैसा अमेरिकेत जातो आणि डॉलर युरोच्या तुलनेत मजबूत होतो ,असा आरोप त्यांनी केला आहे.