Ukraine Russian Jets: युक्ती कामी आली! बलाढ्य रशियाची हवा टाईट झाली; युक्रेनच्या पायलटने सांगितली स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:15 AM2022-03-24T11:15:58+5:302022-03-24T11:16:11+5:30
Ukraine Shoots Down Russian Jets: युक्रेनवर आहेत नाहीत त्या शस्त्रास्त्रांनी जोरदार हल्ले करणाऱ्या रशियावर मोठी नामुष्की ओढविली आहे. रशियाच्या हवाई दलाला सपाटून मार खावा लागला आहे.
युक्रेनवर आहेत नाहीत त्या शस्त्रास्त्रांनी जोरदार हल्ले करणाऱ्या रशियावर मोठी नामुष्की ओढविली आहे. रशियाच्या हवाई दलाला सपाटून मार खावा लागल्याने पायलटनी युक्रेनवर हल्ल्यासाठी लढाऊ विमाने उडविण्यास नकार दिला आहे. युक्रेनने आजवर १००हून अधिक लढाऊ विमाने आणि दीडशेहून अधिक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे.
युक्रेनच्या हवाई दलाचे एक अधिकारी एंद्रीय यांनी सीएनएनला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी आता युद्धाची परिस्थिती युक्रेनला पोषक झाली असल्याचे म्हटले आहे. परिस्थिती आता शांततेकडे जाऊ लागली आहे. सुरुवातीला रशियन फौजा अधिक होत्या त्यामुळे आम्हाला ते भारी पडत होते. परंतू आता अनेक रशियन पायलटांनी उड्डाण करण्यास नकार दिला आहे. कारण आम्ही त्यांना मारत आहोत, असा दावा केला आहे. आम्ही रशियाचीच सुखोई-२७ ही लढाऊ विमाने चालवत आहोत. परंतू अद्ययावत असलेल्या रशियाच्या लढाऊ विमानांना पाडत आहोत, असे म्हटले आहे.
रशियन पायलटांकडे आमच्यापेक्षा खूप अद्ययावत विमाने आहेत. ते खूप दूरवरून आमच्यावर मिसाईलचा मारा करत आहेत. जेव्हा आम्ही त्यांना मारण्यासाठी झेप घेतो तेव्हा आमच्यापर्यंत त्यांची मिसाईल आलेली असते. ते तेव्हाही आमच्या टप्प्याच्या बाहेर असतात. परंतू आम्हाला नाटो आणि अमेरिकेना दिलेले प्रशिक्षण उपयोगी येत असल्याचे एंद्रीय म्हणाले.
आम्ही अमेरिकेच्या एफ-15 आणि एफ-16 फाइटर जेटसोबत काही वर्षांपूर्वी सराव केला होता. यावेळी आम्ही आमच्या जुन्या विमानांनी नवीन विमानांना कशी टक्कर द्यायची याची युक्ती विकसित केली आहे. ती आता उपयोगी पडत आहे. पश्चिमी देशांकडून आम्हाला काही डिफेंस यंत्रणा मिळाली आहे, त्याद्वारे आम्ही सुरक्षित आणि आरामात उड्डाण घेऊ शकत आहोत. यामुळे रशियाचे पायलट घाबरलेले आहेत, असा दावा त्यांनी केला.
युक्रेनच्या सैन्याने सांगितले की, आम्ही रशियाच्या संभाव्य हल्ल्याची आठ वर्षांपासून तयारी करत होतो. आमच्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीने रशियावर कशी मात करता येईल याचा आम्ही अभ्यास केला. यामुळेच रशिया आमच्या हवाई क्षेत्रावर कब्जा करण्यात अपय़शी ठरला आहे.