इंटरनेट बंद केले तर युक्रेनचे संरक्षण धोक्यात; इलॉन मस्क यांची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:31 IST2025-03-11T10:31:53+5:302025-03-11T10:31:53+5:30
युद्धाच्या काळात लष्करी संपर्क राखण्यासाठी स्टारलिंक प्रणाली ठरलेली अत्यंत उपयोगाची

इंटरनेट बंद केले तर युक्रेनचे संरक्षण धोक्यात; इलॉन मस्क यांची धमकी
वॉशिंग्टन : टेस्ला आणि स्टारलिंकचे सीईओ इलॉन मस्क यांनी युक्रेनचे इंटरनेट बंद करण्याची धमकी दिली आहे. मस्क यांनी रविवारी सांगितले की, जर त्यांनी युक्रेनमधील त्यांची स्टारलिंक इंटरनेट प्रणाली बंद केली तर युक्रेनची संरक्षण प्रणाली बंद पडेल.
मस्कची स्टारलिंक इंटरनेट प्रणाली युक्रेनला लष्करी संपर्क राखण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. मस्क यांनी ही पोस्ट केली होती. तथापि, नंतर त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये स्पष्ट केले मी युक्रेनच्या धोरणाच्या कितीही विरोधात असलो तरी, मी तिथे स्टारलिंकचे कधीही बंद करणार नाही. मस्क यांच्या पोस्टवर, पोलंडचे परराष्ट्रमंत्री राडोस्लाव सिकोर्की म्हणाले की, पोलंड युक्रेनच्या स्टारलिंकसाठी दरवर्षी ५० दशलक्ष डॉलर देते. स्पेसएक्स विश्वसनीय राहिले नाही, पर्याय शोधावे लागतील. यावर मस्क म्हणाले, गप्प बस, छोट्या माणसा. स्टारलिंकच्या किमतीचा एक छोटासा भाग तुम्ही देता. तरीही स्टारलिंकशिवाय पर्याय नाही.
अमेरिकेने युक्रेनची ८.७ हजार कोटींची मदत थांबवली
अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत थांबवली आहे. 'न्यू यॉर्क टाइम्स'च्या मते, याचा परिणाम एक अब्ज डॉलर्स (८.७ हजार कोटी रुपये) किमतीच्या शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा मदतीवर होऊ शकतो. हे लवकरच युक्रेनला पोहोचविण्यात येणार होते. ट्रम्पच्या आदेशामुळे युक्रेनला फक्त अमेरिकन संरक्षण कंपन्यांकडून थेट नवीन लष्करी हार्डवेअर खरेदी करण्यासाठी मिळणारी मदत रोखली जाते. अमेरिकेच्या मदतीच्या निलंबनाबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मदत थांबल्यास परिणाम २ ते ४ महिन्यांत दिसेल
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे मार्क कॅन्सियन म्हणाले की, अमेरिकेने मदत थांबविण्याच्या निर्णयाचा युक्रेनवर मोठा परिणाम होईल.
मदत थांबविल्याने युक्रेनची ताकद आता निम्मी झाली आहे. त्याचा परिणाम दोन ते चार महिन्यांत दिसून येईल. सध्या तरी, युरोपीय देशांकडून मिळणाऱ्या मदतीमुळे युक्रेन काही काळ लढाईत राहील.
झेलेन्स्कीच्या वाईट वर्तनामुळे हा निर्णय
व्हाइट हाउसच्या एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, झेलेन्स्कीच्या वाईट वर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आला हे स्पष्ट आहे. जर झेलेन्स्कीने युद्ध संपविण्यासाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ही बंदी उठवता येईल, असे ते म्हणाले.
तीन वर्षे रशियाविरोधात शस्त्रे, दारूगोळा पुरविला
अमेरिका युक्रेनचा मोठा समर्थक राहिला आहे. गेल्या ३ वर्षांत, अमेरिकेने रशियाविरुद्धच्या संघर्षात युक्रेनला शस्त्रे, दारूगोळा आणि आर्थिक मदत पुरविली आहे. वृत्तानुसार, ही मदत थांबविल्याने युक्रेनच्या संरक्षण क्षमतेवर परिणाम होईल. युक्रेनला त्याच्या भूभागावर नियंत्रण राखण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढवला जात आहे.