नवी दिल्ली – गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता युक्रेनने मॉस्कोवर भीषण हल्ला केला आहे. युक्रेनी सैन्याचे ड्रोनने मॉस्कोतील २ इमारतींना टार्गेट केले. या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या हल्ल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले पण कुणीही जखमी नाही अशी माहिती मॉस्कोचे मेयर यांनी दिली.
युक्रेनच्या या हल्ल्यानंतर रशियाने मॉस्कोच्या वनुकोवो एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. युक्रेन सीमेपासून ५०० किमी अंतरावरील मॉस्को आणि आसपासच्या शहरांना ड्रोनने निशाणा बनवण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून ड्रोन हल्ल्याची मालिका शहरातील दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या एका विमानतळावरील हल्ल्यापासून सुरू झाली होती. रशियाने सांगितले होते की, त्या रात्री युक्रेनचे ५ ड्रोन पाडले होते. ड्रोन हल्ले अमेरिका आणि नाटोतील सहकारी देशांच्या मदतीशिवाय शक्य नाहीत असा आरोप रशियाने केला आहे.
शुक्रवारी रशियाने म्हटलं की, यूक्रेन सीमेजवळील दक्षिणी रोस्तोव क्षेत्रात २ युक्रेनी मिसाईल रोखल्या. ज्यात तगानरोग शहरात ढिगारा कोसळल्याने १६ लोक जखमी झालेत. मागील वर्षी फेब्रुवारीत मॉस्कोकडून केलेल्या सैन्य कारवाईला उत्तर म्हणून युक्रेन सीमेलगत परिसरात वारंवार ड्रोन हल्ले आणि गोळीबारी होत असल्याचे दिसून येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत शांततेसाठी चर्चा होऊ शकते परंतु युक्रेन हल्ल्यामुळे तणाव आणखी वाढतोय असं म्हटलं. शुक्रवारी सेंट पीटर्सबर्गमध्ये आफ्रिकन नेत्यांसोबत मुलाखतीनंतर पुतिन यांनी मीडियाशी संवाद साधला होता.
काही दिवसांपूर्वीही झाला होता हल्ला
काही दिवसांपूर्वीही युक्रेनने रशियातील ताब्यात असलेल्या माकिव्का शहरावर हल्ला केला. रात्री केलेल्या या हल्ल्यात युक्रेनी सैन्याने अमेरिकेकडून मिळालेल्या हिमरास रॉकेट्सचा वापर केला होता. युक्रेन सैन्याने २ रॉकेट टार्गेट करत तेल डेपोवर डागले होते. रॉकेट्समुळे पहिला स्फोट छोटा झाला. परंतु हळूहळू स्फोट मोठा झाला. अमेरिका ज्वाइंट चीफ स्टाफ जनरल मार्क ए माइलीने सांगितले की, युक्रेन सैन्य त्यांच्या रणनीतीने पुढे जात आहे. सध्या रशियाच्या कब्जात असलेल्या परिसरावर युक्रेनला कब्जा करण्यासाठी वेळ लागेल असं म्हटलं.