मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आले आहेत. युद्धात युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. बलाढ्य रशियन लष्करालादेखील युद्धात बरंच नुकसान सहन करावं लागलं आहे. रशियन लष्कराचे अनेक रणगाडे, हवाई दलाची विमानं युक्रेननं जमीनदोस्त केली. गेल्याच आठवड्यात काळ्या समुद्रात रशियाची मोस्कवा नावाची युद्धनौका बुडाली. त्यामुळे रशियाला जबर हादरा बसला.
सोव्हिएत काळापासून मोस्कवा युद्धनौका कार्यरत आहे. विशेष म्हणजे या नौकेची निर्मिती सोव्हिएत युक्रेननं केली होती. तेव्हा तिचं नाव स्लावा ठेवण्यात आलं होतं. १९९५ मध्ये स्लावा रशियाकडे गेली. रशियानं तिचं नाव राजधानी मॉस्कोवरून मोस्कवा असं केलं. गेल्याच आठवड्यात मोक्सवाला काळ्या समुद्रात जलसमाधी मिळाली. ही नौका बुडत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मोस्कवा बुडाल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं होतं. तर दारूगोळ्यानं पेट घेतल्यानं युद्धनौका बुडाल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला. मोस्कवावर ५०० जण तैनात होते. आग लागल्यानंतर सगळ्यांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचा रशियाचा दावा आहे. तर युद्धनौका बुडाल्यानंतर काहींचा मृत्यू झाल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं.
मोस्कवा बुडाल्याचा फारसा परिणाम रशियन नौदलावर होणार नसल्याचं युद्ध रणनीतीकार सांगतात. मोस्कवा बरीच जुनी नौका होती. पाच वर्षांनंतर नौकेची सेवा संपणार होती. युक्रेन युद्धात रशियन नौदलाची भूमिका मर्यादित राहिली आहे. त्यामुळे नौका बुडाल्याचा फारसा परिणाम युद्धावर होणार नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.