रशियात पाय ठेवताच अटक करणार! 'या' देशाच्या पंतप्रधानांविरोधात पुतिन यांच्या पोलिसांचं वॉरंट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:09 PM2024-02-14T20:09:24+5:302024-02-14T20:11:59+5:30
एस्टोनिया, लातव्हिया आणि लिथुआनिया, या तीनही देशांनी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, सोव्हियत काळातील अनेक स्मारके नष्ट केले आहेत. यात दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सोव्हियत सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांचाही समावेश आहे.
युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियन पोलिसांनी नाटो देशांच्या अनेक नेत्यांना 'वॉन्टेड लिस्ट'मध्ये टाकले आहे. यात एस्टोनियाच्या पंतप्रधान काया कलास यांचे नाव मुख्य आहे. याशिवाय लिथुआनियाच्या सांस्कृतिक मंत्री आणि लतावियाच्या गेल्या सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावेही या वॉन्टेड लिस्टमध्ये टाकण्यात आली आहेत. रशियन सरकारी संस्था TASS नुसार, बाल्टिक नेत्यांवर 'सोव्हियत सैनिकांच्या स्मरनार्थ तयार करण्यात आलेले स्मारक नष्ट केल्याचा' आरोप आहे. रशियामध्ये अशा गुन्ह्यासाठी 5 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
या नेत्यांनी सीमा ओलांडून रशियात प्रवेश केल्यास त्यांना अटक होऊ शकते. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारकडून या नेत्यांविरोधात खटलाही चालविला जाऊ शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. यासंदर्भात बोलताना रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झखारोवा म्हणाल्या, "ही केवळ सुरुवात आहे. नाझीवाद आणि फॅसिझमपासून जगाला मुक्त करणाऱ्यांच्या स्मृतीच्या विरोधात गुन्हा करणाऱ्यांवर खटला चालवायला हवा."
पुतिन सरकारच्या या निर्णयासंदर्भात बोलताना कलास म्हणाल्या, ही कारवाई आपल्या गप्प करू शकणार नाही. तसेच, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी कलास यांच्या समर्थनार्थ X वर पोस्ट करत पुतिन यांना सुनावले आहे.
'संपूर्ण युरोप आपल्यासोबत' -
कलास यांनी X वर लिहिले आहे, 'क्रेमलिन वाटत असेल की, ते अशा पावलांद्वारे मला आणि इतरांना गप्प करू शकतील. मात्र असे होणार नाही. मी युक्रेनच्या समर्थनार्थ अशीच उभी राहील.' याच बरोबर सांचेज यांनी कलास यांच्या समर्थनार्थ X वर पोस्ट केली आहे. यात, 'पुतिन यांचे हे पाऊल लोकशाही आणि स्वतंत्रतेच्या रक्षणार्थ आपला साहस आणि एस्टोनियाच्या नेतृत्वाचे आणकी एक प्रमाण आहे. ते आपल्याला धमकावू शकणार नाहीत. स्पॅनिश लोक आणि युरोप आपल्या पाठीशी आहे.'
म्हणून पुतिन यांनी उचललं असं पाऊल -
एस्टोनिया, लातव्हिया आणि लिथुआनिया, या तीनही देशांनी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, सोव्हियत काळातील अनेक स्मारके नष्ट केले आहेत. यात दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सोव्हियत सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांचाही समावेश आहे. यानतंर रशियन तपास समितीचे प्रमुख अलेक्झॅन्डर बॅस्ट्रीकिन यांनी तपास सुरू केला आहे.