रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता वर्ष होऊन गेले आहे. तरी देखील रशियाला युक्रेनमध्ये काही मुसंडी मारता आलेली नाहीय. असे असले तरी जिवीत आणि वित्तहानी होण्यापेक्षा युद्ध थांबलेले बरे, अशा मताचे जगातील सर्वच देश आहेत. यासाठी प्रत्येक देश त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत आहे. काहींनी रशियावर निर्बंध लादले आहेत. तर काही जण रशियाशी चांगले संबंध ठेवून चर्चा करत आहेत. परंतू, अमेरिकेला युक्रेनमध्ये रशियाने शस्त्रसंधी करायला नको आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने शुक्रवारी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. रशियाने युक्रेनमध्ये शस्त्रसंधी करावी, अशी मागणी चीनने केली आहे. याचा अमेरिका विरोध करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. शस्त्रसंधीचा फायदा रशियालाच अधिक होईल असे अमेरिकेचे म्हणणे आहे. हे कारण काहीसे विचित्र वाटत असले तरी यामागे अमेरिकेने कारण दिले आहे.
रशियाने शस्त्रसंधी केली तर त्यांना पुढील हल्ल्याची तयारी करण्यासाठी मोठा कालावधी मिळेल. रशियन सैन्यावरील दबाव कमी होईल व ते पुन्हा जोरदार हल्ले करतील, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पुढील आठवड्यात चीनचे नेते शी जिनपिंग यांच्या मॉस्को भेटीवर आपले मत व्यक्त केले आहे.
बायडेन जिनपिंगना फोन करणार...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या मुद्द्यावर बोलण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन करणार आहेत. परंतू, ते कधी चर्चा करतील हे अद्याप ठरलेले नाहीय. बायडेन बोलण्यास इच्छुक असले तरी यावर अद्याप प्रक्रिया सुरु झालेली नाही असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.