किव्ह : युक्रेनने रशियात प्रथमच हवाई हल्ला केला असून, तेथील बेल्गोरोड शहरातला एक ऑइल डेपो उद्ध्वस्त केला. त्यात रशियाचे दोन जण जखमी झाले आहेत. कब्जा केलेल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पातून रशियाने आपले सैन्य मागे घेतले असून, तो प्रकल्प पुन्हा युक्रेनच्या ताब्यात गेला आहे. या अणुप्रकल्पातील वाढत्या किरणोत्सर्गाचा धोका लक्षात आल्याने रशियाच्या लष्कराने तिथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते.
युक्रेनची ऊर्जा कंपनी एनेर्जोॲटमने सांगितले की, चेर्नोबिल अणुप्रकल्पाजवळील जंगलात खंदक खणत असलेल्या रशियाच्या सैनिकांना वाढलेल्या किरणोत्सर्गाचा सामना करावा लागला. जिवाला धोका आहे हे ओळखून त्यांनी या परिसरातून काढता पाय घेतला. युक्रेनने पलटवार करून रशियातला बेल्गोरोड येथील ऑइल डेपो उद्ध्वस्त केला, तसेच युक्रेनने चेर्निहिवजवळील स्लोबोडा व लुकाशिवका या गावांवर पुन्हा ताबा मिळविला आहे.
रशिया आणखी हल्ले करणारn किव्ह व चेर्निहिववरील हल्ले कमी केल्याचा रशियाने दावा केला असला तरी, या दोन ठिकाणी अद्यापही हवाई, तसेच क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. रशियाने आणखी जोरदार हल्ले करण्याची पूर्वतयारी केली असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.n मारियुपोलमध्ये अडकलेल्या शेकडो नागरिकांना अन्न-पाण्याचा पुरवठा करण्याचे प्रयत्न रशियाच्या लष्कराने पुन्हा एकदा हाणून पाडले, तसेच मारियुपोलमधून दुसऱ्या शहरात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची रशियाकडून अडवणूक होत आहे.
ऑस्ट्रेलिया सुरुंगरोधक बुशमास्टर ही चारचाकी लष्करी वाहने युक्रेनला देणार आहे. ही वाहने युरोपला लवकरच रवाना होतील.
मात्र, ती युक्रेनमध्ये कधी दाखल होतील हे सांगता येत नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली.
ही लष्करी वाहने व संरक्षणविषयक मदत देण्याचे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी ऑस्ट्रेलियाला केले होते.