रशियाला युक्रेनचा दणका, क्षेपणास्त्र हल्ल्याने हादरा; ४०० रशियन ठार झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:18 AM2023-01-03T08:18:31+5:302023-01-03T08:19:00+5:30
युक्रेनने मकीव्का शहरातील एका इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला.
कीव : रशियाव्याप्त डोनेस्तक प्रदेशावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुमारे ४०० रशियन सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला. तथापि, रशियन अधिकाऱ्यांनी या स्फोटामध्ये केवळ ६३ सैनिक मृत्युमुखी पडल्याचे म्हटले.
युक्रेनने मकीव्का शहरातील एका इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या इमारतीत रशियन सैन्य थांबलेले होते, असे मानण्यात येते. युक्रेनच्या लष्कराने अमेरिकानिर्मित हिमर्स रॉकेट प्रणालीचा वापर करून रशियन सैन्य असलेल्या इमारतीवर रॉकेटचा मारा केला. नववर्षाच्या मध्यरात्रीनंतर दोन मिनिटांनी दोन क्षेपणास्त्र धडकले. त्यात शाळेचे मोठे नुकसान झाले. सर्वत्र जखमी व मृतदेह पडलेले होते, असे एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याने सांगितले.
ड्रोनवर ‘हॅप्पी न्यू इयर’ लिहून युक्रेनवर हल्ला
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे व नववर्षाच्या पूर्वसंध्येला रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियन भाषेत ‘हॅपी न्यू इयर’ असा संदेश लिहिलेल्या ड्रोनद्वारे हल्ला केला.