रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. एकीकडे अमेरिकेसह सर्व नाटो देशांनी रशियाच्या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे भारत आणि चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांनी या संपूर्ण वादावर तटस्थ भूमिका घेतली आहे. रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून जाहीर केल्यानंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. अमेरिका रशियावर मंगळवारपासून नवीन निर्बंध लागू करणार असल्याची माहिती व्हाइट हाऊसने दिली. या निर्बंधांबाबत इतर देशांसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी दिली.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे. रशियाच्या निर्णयामुळे फ्रान्स, अमेरिका, जर्मनी रशियाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनंही या घटनेनंतर आपत्कालीन बैठक बोलवली आहे. याचं अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिलेय. भारतही आपली भूमिका या बैठकीत मांडणार आहे.
युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र युक्रेनदेखील रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. युक्रेनचं महिला सैन्यही सज्ज झालं आहे. तसेच युक्रेनमध्ये एकाएकी महिला सैन्यात सहभागी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. देशाच्या संरक्षणार्थ या महिला त्यांची कुटुंबही मागे सोडून धाडसी पाऊल उचलताना दिसत आहेत. युक्रेनमधील महिला आता प्राथमिक युद्धाभ्यास, शस्त्र चालण्याचं प्रशिक्षण, स्वसंरक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत. पुरुष सैन्यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांची ही तुकडी सध्या देशाच्या रक्षणालाठी पाय घट्ट रोवून उभी असल्याची माहिती समोर आली आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे कथित उल्लंघन केल्याबद्दल रशियाचा निषेध केला आहे. जपान रशियावर निर्बंधांसह इतरही कारवाई करण्याचा विचार करू शकतो असा इशारा दिला आहे. रशिया फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं मत अमेरिकेकडून व्यक्त केलं जात होतं. त्यांचा दावा आहे की, सुमारे 1 लाख रशियन सैन्य गेल्या आठवड्यापासून युक्रेनच्या सीमेजवळ तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया थंड वातावरण पाहता युक्रेनभोवतीचा बर्फ वितळण्याची वाट पाहत आहे.
अमेरिका रशियावर निर्बंध लावणार-
रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून जाहीर केल्यानंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. अमेरिका रशियावर मंगळवारपासून नवीन निर्बंध लागू करणार असल्याची माहिती व्हाइट हाऊसने दिली. या निर्बंधांबाबत इतर देशांसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी दिली.