रशिया आणि युक्रेन यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धामध्ये दररोज लहानमोठ्या चकमकी घडत आहेत. दरम्यान, युक्रेनने मंगळवारी रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला घडवून आणला असून, रशियन सैन्यानेही कारवाई करत देशाच्या दहा विविध भागात मिळून ३३७ युक्रेनी ड्रोन पाडले आहेत. मागच्या तीन वर्षांमध्ये युक्रेनने रशियावर केलेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे.
एकीकडे युक्रेनचं एक प्रतिनिधी मंडळ रशियासोबत तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्याबाबत अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेणार असतानाच दुसरीकडे हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याबाबत युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने कुठलंही विधान करण्यात आलेलं नाही.