जेव्हापासून रशियानं युक्रेनवर हल्ले सुरू करून युद्धाला तोंड फोडलं, तेव्हापासून संपूर्ण जगातून रशियावर ताशेरे ओढले जाताहेत. त्यांनी युक्रेनवरील हल्ले थांबवावेत, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत, असा सज्जड दमही रशियाला दिला जाताेय, रशियाचं नाक, तोंड दाबलं जातंय; पण आडदांड रशिया अजून तरी कोणाच्याही धमक्यांना बधलेला नाही. जगातील सर्वसामान्य नागरिकही रशियाच्या अत्याचारांचा निषेध करताहेत, एवढंच नाही, खुद्द रशियन नागरिकही ‘युद्ध थांबवा’ म्हणून आपल्याच सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून निदर्शनं करताहेत.
रशियाविरुद्ध जगभरातून निषेधाचे वारे वाहत असताना, फ्रान्समधील दोन लढवय्या तरुणांनी मात्र रशियाच्या निषेधार्थ एक अतिशय अफलातून असा वेगळाच मार्ग पत्करला. त्यांच्या या धाडसाचं अख्ख्या जगातून कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. फ्रान्सच्या या दोघा तरुणांपैकी एकाचं नाव आहे लीओ अर्बन, तर त्याच्या मित्राचं नाव आहे लँडॉट. युक्रेनच्या समर्थनार्थ म्हणून या दोघांनी काय करावं? .. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे मोंटपार्नासे नावाची एक गगनचुंबी बिल्डिंग आहे. फ्रान्समधील ही सर्वात उंच बिल्डिंग आहे. तिची उंची आहे तब्बल ६८९ फूट (२१० मीटर)! युक्रेनवरील रशियन दडपशाहीचा निषेध म्हणून हे दोघंही मित्र फ्रान्समधील ही सर्वांत उंच बिल्डिंग खालपासून वरपर्यंत चढून गेले.
अर्थातच या चढाईचं वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षेसाठी त्यांनी दोर वगैरे काहीही लावलेला, बांधलेला नव्हता. केवळ हात आणि पायांच्या साह्याने ते ही बिल्डिंग चढून गेले. यात अपघात होण्याचा आणि पडले असते, तर कपाळमोक्ष होऊन थेट मृत्यूला सामोरं जाण्याची खूप मोठी भीती होती; पण त्यांनी स्वत:च्या जीवाची फिकीर न करता या इमारतीची चढाई यशस्वीपणे पार पाडली. त्यांची ही चढाई पाहण्यासाठी इमारतीच्या खाली शेकडो लोकांची गर्दी झाली होती. सगळेजण डोळ्यांत प्राण आणून ही अनोखी चढाई थरथरत्या हृदयानं पाहत होते. त्याचवेळी कोणी त्यांचे फोटो काढत होतं, तर कोणी व्हिडिओ काढत होतं. त्यांच्या या चढाईचे फोटो, व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावरही टाकले आणि जगभरातून लक्षावधी लोकांनी हा जीवघेणा थरार स्वत:च्या डोळ्यांनी बघितला..
या दोघा मित्रांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युक्रेनच्या ध्वजाचा रंग असलेले कपडे परिधान करून त्यांनी ही चढाई केली. आपली चढाई पूर्ण होताच युक्रेनला समर्थन म्हणून युक्रेनचा राष्ट्रीय ध्वजही त्यांनी या इमारतीवर फडकावला. या चढाईसाठी त्यांना ५२ मिनिटं लागली. हे दोन्हीही मित्र उत्तम गिर्यारोहक तर आहेतच; पण पाहताना थरकाप उडेल अशा उंचच उंच बिल्डिंग्जवर, कुठल्याही सुरक्षेशिवाय, आधाराशिवाय चढण्याचा विक्रम करण्याचा त्यांना नाद आहे. यातील लँडॉट यानं यापूर्वी याच मोंटपार्नासे टॉवरवर गेल्या वर्षी दोनवेळा यशस्वी चढाई केली आहे, तर त्याचा मित्र अर्बन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोणत्याही आधाराविना थेट आयफेल टॉवरच चढून गेला!
आपली मोहीम फत्ते केल्यानंतर ‘नो टू वॉर’ असा संदेश जगाला देताना या दोन्हीही मित्रांनी म्हटलं, ‘सध्याच्या स्थितीत युक्रेनियन नागरिक ज्या हिमतीनं बलाढ्य रशियाच्या आक्रमणाला तोंड देत आहेत, छातीला छाती भिडवत आहेत, ते काबिले तारीफ आहे. त्यांच्या या धैर्याला आमचा मनापासून सलाम! या युद्धात ज्या निष्पाप नागरिकांना आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यांनाही आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो.’
यासंदर्भात अर्बन सांगतो, ‘युक्रेनची सर्वसामान्य जनता ज्या जिद्दीनं लढते आहे, त्याच्या तुलनेत आमचं साहस एक टक्काही नाही.’ त्याचवेळी त्याचा मित्र लँडॉटचं म्हणणं आहे, ‘अशा प्रकारच्या इमारतींवर चढणं सोपं नाही. उठलं आणि लगेच झटपट चढाईला सुरुवात केली, काही सेकंदात ती संपवली, असा ‘स्प्रिंट’सारखा हा प्रकार नाही. ही एक प्रकारची मॅरेथॉन आहे; ज्यासाठी प्रचंड एकाग्रतेची आवश्यकता असते. एक क्षण जरी एकाग्रता ढळली तरी तुमची प्राणाशी गाठ असते. या चढाईच्या वेळी अख्खं जग आमच्याकडे डोळे लावून पाहत होतं, त्यामुळे ही चढाई आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि त्याचवेळी अतिशय कठीणही होती. रशियन दडपशाहीला विरोध आणि युक्रेनला समर्थन करणाऱ्या आमच्या या चढाईला जगभरातील लोकांनीही पाठिंबा दिला होता. त्यामुळेच ही चढाई करणारे केवळ आम्ही दोघंच नव्हतो, तर जगभरातील लक्षावधी लोकही आमच्याबरोबर ही चढाई करत होते..’