Russia Ukraine War : युद्ध पेटलं, मारियुपोल हादरलं! रशियाकडून 'फॉस्फरस बॉम्ब'चा वापर; युक्रेनचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:48 PM2022-03-23T12:48:43+5:302022-03-23T12:57:37+5:30
Russia Ukraine War : रशियाने आता युक्रेनच्या मारियुपोल शहरावर फॉस्फरस बॉम्बच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला असून युद्धाला आता जवळपास महिना पूर्ण होत आहे. रशियाच्या लष्कराकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाने आता युक्रेनच्या मारियुपोल शहरावर फॉस्फरस बॉम्बच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन सेनेकडून या शहरात रशियन लष्कर असलेल्या ठिकाणांवर टँकच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. युक्रेनमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
युक्रेनियन सेनेच्या तुकडीच्या या हल्ल्यापूर्वी काही तास अगोदर रशियन सेनेनं मारियुपोल स्थित युक्रेनियन सेनेची अनेक तळ उद्ध्वस्त केले. या घटनेची ड्रोननं टिपलेले काही फोटोही समोर आले आहेत. रशियानं युक्रेनला उद्ध्वस्त केल्याचा दावा मीडियाने सॅटेलाईट फोटो जाहीर करत केला आहे. तर दुसरीकडे, रशियाने युद्धादरम्यान फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. फॉस्फरस बॉम्ब म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेऊया....
'फॉस्फरस बॉम्ब' कितीपत घातक?
फॉस्फरस हा रंगहीन रसायनाचा एक प्रकार आहे. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानं फॉस्फरस पेट घेतं. पांढरा फॉस्फरस हा मेणासारखा मऊ तंतुमय पदार्थ दिसतो. फॉस्फरसचा वास काहीसा लसणासारखा असतो. प्रकाशात राहिल्यावर या रसायनाचा रंग हळूहळू पिवळा होत जाताना दिसतो. फॉस्फरसचा वापर युद्धादरम्यान स्फोटकं आणि धुराच्या आवरण तयार करण्यासाठी केला जातो. पिवळा फॉस्फरस अत्यंत विषारी असून त्याचा धूरही अत्यंत घातक ठरतो.
पेट घेतलेल्या पांढऱ्या फॉस्फरसचं तापमान 800 डिग्री सेल्सियसपेक्षाही जास्त असतं. या बॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेले लाखो कण पांढर्या धुराप्रमाणे सर्वत्र पसरले जातात. फॉस्फरस बॉम्बच्या संपर्कात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा तत्काळ मृत्यू संभावतो. याचे घातक कण हे मानवी शरीरात प्रवेश करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.