Russia Ukraine conflict : रशियाविरुद्ध रणांगणात उतरणार; युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियन्सची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:03 PM2022-02-25T12:03:19+5:302022-02-25T12:03:52+5:30
ukrainian boxers vitali klitschko and wladimir klitschko : व्हिताली क्लिश्चको यांचा भाऊ व्लादिमीर क्लिश्चको (Wladimir Klitschko) हे देखील बॉक्सिंग चॅम्पियन आहे.
रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई केली आणि युक्रेननेही आता त्याला प्रत्युत्तर दिले आहे. हा वाद चांगलाच चिघळला असून तो आता गंभीर रुप धारण करण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, युक्रेनचे माजी बॉक्सिंग चॅम्पियन व्हिताली क्लिश्चको (Vitali Klitschko) यांनी रशियाविरुद्ध आपल्या भावासोबत युद्धाच्या रणांगणात उतरण्याची घोषणा केली आहे. व्हिताली क्लिश्चको यांचा भाऊ व्लादिमीर क्लिश्चको (Wladimir Klitschko) हे देखील बॉक्सिंग चॅम्पियन आहे. दोन्ही भावांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.
गुरुवारी, 50 वर्षीय व्हिताली क्लिश्चको यांनी युद्धात सामील होण्याची घोषणा केली. यावेळी 'माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला हे करावे लागेल. मी लढेन माझा युक्रेनवर विश्वास आहे. माझा देश आणि तेथील लोकांवर विश्वास आहे', असे व्हिताली क्लिश्चको यांनी सांगितले. दरम्यान, व्हिताली क्लिश्चको हे युक्रेनची राजधानी कीव्हचे महापौर देखील आहेत. 2014 पासून ते या पदावर आहेत. व्हिताली क्लिश्चको म्हणाले की, 'कीव शहर संकटात आहे. पोलीस आणि लष्करासोबतच वीज, गॅस आणि पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याला पहिले प्राधान्य आहे.'
व्हिताली क्लिश्चको यांचे भाऊ व्लादिमीर आधीच युक्रेनियन रिझर्व्ह आर्मीमध्ये सामील झाले आहेत. गुरुवारी त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, 'युक्रेनचे लोक मजबूत आहेत आणि हे या युद्धात खरे ठरेल. हे लोक शांतता आणि सार्वभौमत्वाची अपेक्षा करतात. हे असे लोक आहेत जे रशियाच्या लोकांना आपले भाऊ मानतात. युक्रेनच्या लोकांना युद्ध नको आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.' याचबरोबर, व्लादिमीर यांनी आपल्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, युक्रेनच्या जनतेने लोकशाहीची निवड केली आहे. पण लोकशाही नाजूक आहे. लोकशाही स्वतःचे रक्षण करू शकत नाही. त्यासाठी सर्व नागरिकांची इच्छाशक्ती आणि बांधिलकी आवश्यक आहे
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यानंतर युक्रेनवर रशियाचे हल्ले (Russian Attacks on Ukraine) तीव्र होत आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये (Kyiv) स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियन सैन्याने युक्रेनवर जल, जमीन आणि हवाई मार्गाने हल्ला केला आहे. युक्रेनच्या प्रमुख शहरांमधून दहा लाखांहून अधिक लोकांनी पलायन केले आहे, तर डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे.