Russia-Ukraine War: शस्त्रास्त्र अन् दारुगोळा मिळाला आता रशियाला 'धक्का' देणार, युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 02:03 PM2022-03-07T14:03:56+5:302022-03-07T14:04:27+5:30
Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्ध रशियानं पुकारलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस असून रशियाकडून अजूनही युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ला केला जात आहे.
Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्ध रशियानं पुकारलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस असून रशियाकडून अजूनही युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ला केला जात आहे. तर युक्रेनकडूनही रशियन कारवाईचा जोरदार प्रतिकार केला जात आहे. युक्रेननं पाश्चिमात्य देशांकडे शस्त्रास्त्र पुरवठा करण्याची मागणी लावून धरलेली असताना आता युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी मोठी माहिती दिली आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री रेझनिकोव्ह यांनी आम्हाला आवश्यक शस्त्रास्त्र आणि दारुगोळा मिळाला असून लवकरच रशियाला जोरदार धक्का देऊ असं विधान केलं आहे. त्यामुळे युद्ध आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
युक्रेनचे संरक्षण मंत्री यांनी एक व्हिडिओ जारी करुन याबाबतची माहिती दिल्याचं बोललं जात आहे. आम्हाला केवळ पाठिंबा नको, आम्ही इथं युद्ध लढत आहोत. शस्त्रास्त्र आणि लढाऊ विमानं द्या, असं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केलं होतं. युक्रेनमध्ये मानवतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील असं आश्वासनही रेझनिकोव्ह यांनी दिलं आहे.
#Ukrainian Defense Minister #Reznikov said that there has been significant progress in the supply of weapons and ammunition to the country and promised #Russia a "surprise". pic.twitter.com/w5aColJIfk
— NEXTA (@nexta_tv) March 7, 2022
पंतप्रधान मोदींची जेलेन्स्की यांच्याशी चर्चा
सरकारमधील टॉप सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. मोदी आणि जेलेन्स्की यांच्यात जवळपास ३५ मिनिटं फोनवर संवाद झाला. आज सकाळी ११.३० मिनिटांनी मोदींनी जेलेन्स्की यांनी फोन केला. त्यानंतर दोघांमध्ये सद्य परिस्थितीवर चर्चा झाली.
युद्ध विरामासाठी रशिया आणि युक्रेनकडून चर्चा केली जात असल्याच्या मुद्द्याचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्याचं बोललं जात आहे. यासोबतच भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात परतण्यासाठी युक्रेनकडून केलं जात असलेल्या सहकार्याबाबत मोदींनी जेलेन्स्की यांचे आभार व्यक्त केले आहेत. युक्रेनच्या सुमी येथून भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या पाठिंब्याची मागणी केली आहे.