तुर्कस्तानातील सम्मेलनात युक्रेनच्या खासदाराची रशियन अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:01 PM2023-05-05T21:01:30+5:302023-05-05T21:02:06+5:30
याचा व्हिडिओही मारिकोवस्की यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे.
तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे सुरू असलेल्या ब्लॅक सी देशांच्या सम्मेलनादरम्यान रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी युक्रेनच्या प्रतिनिधीने रशियन अधिकाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अखेर घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले. तुर्कस्तानच्या संसद भवनात आयोजित एका सम्मेलनादरम्यान युक्रेनचा ध्वज हातातून हिसकावल्यानंतर, युक्रेनचे खासदार ओलेक्झँडर मारिकोवस्की यांनी रशियन अधिकाऱ्याच्या डोक्यात ठोसा मारला. याचा व्हिडिओही मारिकोवस्की यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये युक्रेनचे खासदार रशियाच्या प्रतिनिधी ओला टिमोफिसा यांच्या मागे युक्रेनचा झेंडा फडकावताना दिसत आहेत. याचदरम्यान एक व्यक्ती मारिकोवस्की यांच्याजवळ येते आणि त्याच्याकडून ध्वज हिसकावून घेते. यानंतर मारिकोवस्की यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला आणि तिला पकडून डोक्यात ठोसे मारायला सुरुवात केली. तेवढ्यात तेथील इतर काही लोक या दोघांना एकमेकांपासून वेगळे करतात. यापूर्वीही, जेव्हा टिमोफिसा सभेला संबोधित करत होत्या तेव्हाही युक्रेनच्या प्रतिनिधींनी त्यांच्या दोन्ही बाजूला युक्रेनचे झेंडे फडकावून भाषणात व्यत्यय आणला होता.
तुर्कस्तानच्या संसदेचे अध्यक्ष मुस्तफा सेंटोप यांनी या घटनेचा निषेध केला असून ट्विट करत, 'मी अशा वर्तनाचा निषेध करतो, ज्यामुळे शांततामय वातावरण बिघडते', असे म्हटले आहे. यावेळी रशियन अधिकाऱ्याला मारहाण करत युक्रेनचे खासदार म्हणाले, हा आमचा ध्वज आहे, आम्ही त्याच्या सन्मानासाठी सदैव लढू. या सम्मेलनात एकूण 13 देशांनी सहभाग घेतला होता.