रशियाने कीवपर्यंत धडक मारलेली आहे. अशावेळी युक्रेनचे सैन्य कीव वाचविण्यासाठी धडपडत असताना त्यांच्यावर हवाई हल्ले करण्यासाठी रशियाची लढाऊ विमाने आकाशात उडत आहेत. या विमानांना युक्रेनच्या एका पायलटने सळो की पळो करून सोडले आहे. युक्रेनच्या आकाशातील या भूताची (Ghost of Kyiv) चर्चा होऊ लागली आहे. युक्रेनचे नागरिक या पायलटला आपला हिरो मानू लागले आहेत.
युद्ध सुरु झाल्यापासून MiG-29 Fulcrum लढाऊ विमानाचा पायलट युक्रेनच्या आकाशात खुलेआम घिरट्या घालत आहे. रशियाच्या गोटात त्याने खूप नुकसान केले आहे. आतापर्यंत या पायलटने रशियाची सहा विमाने पाडली आहेत. युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार कमी केला होता तेव्हा देखील हा पायलट रशियाच्या विमानांना टक्कर देत होता. गेल्या तीन दिवसांपासून हा पायलट काही वेळ धावपट्टीवर शस्त्रे आणि इंधन लोड करण्यासाठी उतरत आहे. लढाईच्या काळात अशा गोष्टी काल्पनिक वाटतील परंतू प्रत्यक्षात लढाईच्या वेळचा तणाव खूप असतो. त्या काळात शत्रूची १०० विमाने चहूबाजूंनी आक्रमण करत असताना अशाप्रकारचे धाडस दाखविणे आणि चपळाईने त्यांची विमाने नेस्तनाभूत करणे हे खरोखरच साहसाचे आहे.
युक्रेनचे पत्रकार ख्रिस्तोफर मिलर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, की मी दोन युक्रेनी लढाऊ विमानांना कीवच्या आकाशात लढताना आणि पुन्हा मागे जाताना पाहिले आहे. त्यापैकी एक हा भूत असून शकतो...खरेच भूत असते का सर्वांना जाणून घ्यायचे आहे.
दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी या युक्रेनी भूताने म्हणजेच पायलटने सहा रशियन विमाने पाडली आहेत. हा पायलट आता कीवचे भूत म्हणून ओळखला जात आहे. त्याच्या विमानाचे अनेक व्हिडीओ आज व्हायरल होत आहेत.