किव्ह : युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सिय गोंचारूक (३५) यांनी राजीनामा देण्याची शुक्रवारी तयारी दाखवली. देशाचे अध्यक्ष वोलोदोमायर झेलेन्स्की यांना अर्थव्यवस्थेबद्दल असलेली समज पंतप्रधानांनी टीकेचा विषय केली तो आॅडिओ समोर आल्यावर त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली.
‘आम्हाला अध्यक्षांबद्दल असलेला आदर आणि त्यांच्यावरील विश्वासाबद्दल कोणताही संशय राहू नये म्हणून मी राजीनाम्याचे पत्र लिहून ते अध्यक्षांना दिले,’ असे गोंचारूक यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर म्हटले. गोंचारूक म्हणाले की, ‘माझा संघ (टीम) आणि मी अध्यक्षांचा मान राखत नाही हे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ कृत्रिमरीत्या बनवला गेला आहे.’ ते म्हणाले ‘‘तो खरा नाही. मी पंतप्रधानपदावर आलो ते अध्यक्षांचे कार्यक्रम राबवण्यासाठी.’’ गोंचारूक यांचा राजीनामा मिळाला असून, त्यावर विचार सुरू आहे, असे झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने म्हटले. गेल्या डिसेंबर महिन्यात मंत्री आणि नॅशनल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांतील अनौपचारिक बैठकीतील ते कथित आॅडिओ रेकॉर्डिंग या आठवड्यात बाहेर आले. स्थानिक प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार अध्यक्ष झेलेन्स्की (४१) यांना बैठकीत सहभागी असलेल्यांमध्ये सध्याच्या आर्थिक घडामोडींबद्दल कसे सांगावे यावर चर्चा झाली. झेलेन्स्की हे विनोदी भूमिका साकारणारे असून, राजकारणात अगदीच नवीन आहेत.
एका बैठकीतील चर्चेत गोंचारूक असे म्हणाल्याचे ऐकू आले की, ‘‘अध्यक्षांना खुलासा सोपा करण्याची गरज आहे. कारण त्यांची (झेलेन्स्की) अर्थशास्त्राबद्दलची समज ही जुन्या पद्धतीची आहे. ते (अध्यक्ष) स्वत:देखील अर्थविषयक ‘अडाणी व्यक्ती’ म्हणतात.’’ बुधवारी ते रेकॉर्डिंग समोर आल्यावर गोंचारूक यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते.