वॉशिंग्टन - रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता ३ वर्ष होत आली मात्र अद्यापही दोन्ही देशातील संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यात अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यात ऑन कॅमेरा झालेल्या शाब्दिक संघर्षाने जगाला हैराण केले आहे. हा वाद इतका विकोपाला पोहचला की झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून निघून जाण्यास सांगितले. ट्रम्प यांनी दोन्ही देशातील चर्चा बंद केली.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या चर्चेनंतर ते माध्यमांशी संवाद साधणार होते. या दोन्ही नेत्यांमध्ये मिनरल डिल करारावर चर्चा होणार होती, परंतु मध्येच चर्चा थांबली. राष्ट्रपती ट्रम्प यांनी आधीचे राष्ट्रपती ज्यो बायडन प्रशासनाने युक्रेनला दिलेल्या आर्थिक आणि सैन्य मदतीची भरपाई मागितली. अमेरिकेला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न मिळावं अशी त्यांची इच्छा होती. ट्रम्प यांनी अनेकदा अमेरिकेच्या सपोर्ट बदल्यात ५०० अब्ज डॉलर मिळाले पाहिजेत असं विधान केले. परंतु ३५० अब्ज डॉलरवर चर्चा फायनल होणार होती, परंतु त्या बदल्यात युक्रेनला काहीच मिळणार नाही, सुरक्षा बिल्कुल नाही अशी अट ठेवण्यात आली.
सुरक्षा चर्चेवर ट्रम्प यांनी दिला नकार
विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवर साइन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेत पोहचले होते आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प स्वत: झेलेन्स्की यांच्या स्वागतासाठी बाहेरच्या दरवाजापर्यंत आले. दोन्ही नेत्यांचे चांगले फोटोसेशन झाले. त्यानंतर ट्रम्प, झेलेन्स्की आणि त्यांच्या कॅबिनेटसह एकत्र पत्रकार परिषदेत बसले होते. त्यावेळी एका पत्रकाराने युक्रेनच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारला तेव्हा आम्ही या मुद्द्यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला आता सुरक्षेबाबत काही बोलायचं नाही, फक्त डील व्हायला हवी. मला सुरक्षेची काही चिंता नाही. युरोप त्यांची माणसं तिथे पाठवेल, फ्रान्स, ब्रिटन आणि अन्य देश त्यांना सुरक्षा देतील हे मला माहिती आहे. आम्ही सुरक्षेसाठी कटिबद्ध नाही परंतु आम्ही याबाबत विचार करू शकतो. आम्ही वेगळ्या प्रकारे सुरक्षा देऊ शकतो, आमचे कर्मचारी तिथे असतील, ते डिगिंग करून खनिजे आणतील आणि आम्ही त्या देशात काही चांगले उत्पादन करू असं ट्रम्प यांनी म्हटलं.
दरम्यान, पत्रकाराच्या प्रश्नावर झेलेन्स्की यांनीही प्रतिक्रिया दिली. जर सुरक्षा गॅरंटीची बाब असेल, जर सीजफायरवर बोलायचं असेल तर आम्हाला त्यावर काही बोलायचे नाही कारण त्याचा फायदा झाला नाही. पुतिन यांनी २५ वेळा सीजफायरचं उल्लंघन केले आहे जेव्हा २०१६ मध्ये ट्रम्प राष्ट्रपती होते. त्यामुळे सीजफायरवर आम्ही चर्चा करू शकत नाही. केवळ युद्धबंदीच्या प्रस्तावावर ट्रम्प यांना विश्वास असेल परंतु कागदपत्रे नाही तर एक मजबूत सैन्याची आवश्यकता आहे. आम्ही जेव्हा मजबूत होऊ तेव्हाच पुतिनचे सैन्य आमच्या सैन्याला घाबरेल. जर पुतिन यांना रोखले नाही तर ते कुठल्या अन्य देशांवर आक्रमण करतील. मग ते पोलँडही असेल कारण ते नाटोचे सदस्य आहेत. मग त्या स्थितीत अमेरिकेचे सैन्यही लढत राहील असं झेलेन्स्कीने स्पष्ट सांगितले.
ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक सामना
झेलेन्स्की यांच्या विधानावर ट्रम्प इतके नाराज झाले आणि ते म्हणाले की, तुम्हाला सीजफायर नको आहे आणि तुम्ही तुमच्या माणसांना मरायला देत आहात. तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी जुगार खेळत आहात. तिसऱ्या महायुद्धाचा हा जुगार आहे. तुम्ही जे करताय ते देशासाठी अपमानजनक आहे असं त्यांनी म्हटलं.