मागील दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता रशिया युक्रेनवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. यातच आता युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे युद्धासाठी शस्त्रे पुरवण्याणी विनंती केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी शनिवारी पाश्चात्य राष्ट्रांकडे रशियन बनावटीची विमाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हवेत लढाई लढण्यासाठी विमाने न मिळाल्यास जमिनीवर रक्तपात वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
अमेरिका आणि युरोपियन देशांकडून मिळालेल्या शस्त्रांच्या आधारे युक्रेनी सैन्यानं रशियाला जबर धक्के दिले. अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या शस्त्रास्त्रांची यादी समोर आली आहे. यामध्ये अँटी टँक, अँटी एअर आणि अँटी आर्मर्ड क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अमेरिकेनं डिसेंबरपासूनच युक्रेनी सैन्याला शस्त्रास्त्रं पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनं युक्रेनी सैन्याला शॉटगन आणि स्पेशल सूटदेखील पुरवले. त्यातच आता युक्रेनने रशियावर आर्थिक निर्बंद सुरु ठेवण्याबाबत आवाहन केले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी आज बातचीत केली. यावेळी सुरक्षा, युक्रेनला आर्थिक पाठबळ आणि रशियाविरुद्ध निर्बंध सुरू ठेवण्याबाबत, दोघांमध्ये चर्चा झाल्याची महिती समोर येत आहे.
दरम्यान, अमेरिकेकडून सातत्यानं युक्रेनला लष्करी मदत पाठवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. अमेरिकेकडून मिळालेल्या शस्त्रांच्या मदतीनं युक्रेननं रशियन लष्कराला धक्के दिले. युक्रेनला दिली गेलेली पाहता, त्यांना नेमक्या कोणत्या शस्त्रांची गरज लागणार, याची कल्पना रशियाला आधीपासूनच होती, हे स्पष्ट होत आहे.
झेलेन्स्कीचा दावा- १०,००० रशियन सैनिक मारले
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी दावा केला की, युक्रेनियन सैन्याने देशाच्या मध्य आणि आग्नेय भागातील प्रमुख शहरांवर नियंत्रण ठेवले आहे. तसेच, १० दिवसांच्या युद्धात १०,००० रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही ते करत आहेत. रशियाकडून जीवितहानीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सामायिक केलेली नाही. रशियन सैन्य सध्या खारकीव्ह, निकोलायव्ह, चेर्निहाइव्ह आणि सुमी यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.