Russia Ukraine War: 'आपण दोघं बसून बोलूयात'; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं आवाहन; पुतिन ऐकणार, युद्ध थांबणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:02 PM2022-03-04T14:02:05+5:302022-03-04T14:02:26+5:30
रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या संकटावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहे. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता तिसऱ्या फेरीची चर्चा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानूसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही रशियावर हल्ला केलेला नाही. आम्ही हल्ला करण्याची योजनाही बनवत नाहीय. तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? आमच्या जमीनीवरील ताबा सोडा, असं वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यासोबत बसा. आपण अगदी एकमेकांपासून ३० मीटरवर (जसे तुम्ही फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत बसला होता तसे) बसून बोलूयात, असं आवाहन देखील झेलेन्स्कींनी यांनी पुतिन यांच्याकडे केलं आहे.
रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प एनरहोदर येथे आहे, नीपर नदीवरील शहर आहे जे देशाच्या वीज निर्मितीच्या एक चतुर्थांश भाग आहे. प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले की गोळीबार शुक्रवारी पहाटे सुरू झाला. रशियन सैन्याने गुरुवारी युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या युक्रेनियन शहराच्या नियंत्रणासाठी लढा दिला आणि युक्रेनियन नेत्यांनी नागरिकांना गनिमी युद्ध पुकारण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे ८६२ सशस्त्र वाहनांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ८५ शस्त्रे, ४० ग्रेड सिस्टीम, ३५५ इतर वाहनेही युद्धात नष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय रशियाने २ युद्धनौकाही गमावल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यासोबतच युक्रेनमध्ये ९ विमानविरोधी युद्ध प्रणालीही नष्ट करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुतिन यांची इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा-
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध दिवसेंदिवस वाढत जात आहे. याचपार्श्वभूमीवर आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी ९० मिनिटे फोनवर संवाद साधला. फ्रान्स रशियन लोकांच्या पाठीशी उभा आहे असून त्यांना हे युद्ध नको आहे, असं मॅक्रॉन यांनी यावेळी सांगितलं. मात्र चर्चेदरम्यान पुतीन यांनी आमचं ध्येय साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातील युद्ध आम्ही सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं.