नवी दिल्ली/कीव: बलाढ्य रशियाचा सामना करताना युक्रेनची वाताहत झाली आहे. अनेक शहरांवर हल्ले होत आहेत. रशियन सैन्य राजधानी कीवपर्यंत शिरलं आहे. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे.
मोदी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्याकडे मदतीची मागणी केल्याची माहिती झेलेन्स्की यांनी ट्विट करून दिली आहे. 'पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे १ लाखाहून अधिक हल्लेखोर आमच्या भूमीवर असून ते नागरी वस्त्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती त्यांना दिली. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती त्यांच्याकडे केली. आक्रमकांना एकत्र येऊन रोखुया,' असं झेलेन्स्की यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेला संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. रशिया-युक्रेन युद्धाबद्दल भारतानं तटस्थ भूमिका घेतली. त्याबद्दल युक्रेननं नाराजी व्यक्त केली. अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियाचा निषेध केला असला तरीही कोणत्याही देशानं युक्रेनच्या मदतीला लष्कर पाठवलेलं नाही. भारत आणि रशियाचे संबंध उत्तम आहेत. त्यामुळे झेलेन्स्की यांनी मोदींशी साधलेला संवाद महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतानं युक्रेनची साथ द्यावी, अशी विनंती झेलेन्स्की यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये दोनच दिवसांपूर्वी संवाद झाला. जवळपास २० ते २५ मिनिटं दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या घरवापसीचा मुद्दा यावेळी मोदींनी उपस्थित केला. युक्रेनसोबतचा वाद चर्चेतून सोडवावा, यावर मोदींनी जोर दिला होता.