नवी दिल्ली-
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. यात झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना जी-२० च्या अध्यक्षतेसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच भारतानं संयुक्त राष्ट्रात युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले.
गेल्या जवळपास १० महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यातच दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. यात भारत आघाडीवर आहे. भारतानं याआधीपासूनच शांततेच्या मार्गानं मुद्दा सोडवण्यात यावा अशी भूमिका घेतली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले. तसंच मोदींसोबत फोनवर संवाद झाल्याचीही माहिती दिली आहे. "माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं आणि त्यांना मी जी-२० यशस्वी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा दिल्या. याच मंचावरुन मी शांती सुत्राची घोषणा केली होती आणि यात भारताच्या पाठिंब्याबाबत मी अत्यंत विश्वासू आहे. संयुक्त राष्ट्रात मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत आणि पाठिंब्यासाठी मी भारताचे आभार व्यक्त केले आहेत", असं झेलेन्स्की म्हणाले.