Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिक तीव्र झालं असून रशियन सैन्यानं युक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. रशियन सैन्य आता खारकिवमध्ये शिरलं असून स्थानिक नागरिकांना याबाबतच्या सूचना रशियन सैन्याकडून वारंवार दिल्या जात आहेत. राजधानी कीव मधील नागरिक आता जीव वाचविण्यासाठी ग्रामीण भागांकडे पळ घेऊ लागले आहेत. रशिया दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. रशियानं युक्रेनसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. पण हा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
"आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत. पण बेलारूसमध्ये चर्चा करण्याची आमची तयारी नाही. वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल, बाकू यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस तयार आहोत", झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसंच क्रेमेलिननंही युक्रेनसोबत बेलारुस येथे चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, बेलारुस येथे रशियानं ठेवलेला चर्चेचा प्रस्ताव झेलेन्स्की यांनी फेटाळून लावल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.