बर्लिन : निर्वासितांचे लोंढे यूरोपीय देशांच्या दिशेने जात असतांना आता काही देशांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. या स्थलांतरितांसाठी हा आशेचा किरण समजला जात आहे. २४ हजार नागरिकांना आगामी दोन वर्षात सामावून घेण्याची घोषणा फ्रान्सने केलेली असतानाच जर्मनीने त्यांच्या भागात प्रवेश करणाऱ्या निर्वासितांसाठी सहा अरब युरोची मदत आज जाहीर केली.आयलान या तीन वर्षीय सीरियन मुलाचा मृतदेह तुर्कस्थानच्या किनारपट्टीवर आढळल्यानंतर जगभरातून यावर चर्चा झडली आणि निर्वासितांना स्वीकारण्यास सुरुवातीला नकार देणाऱ्या देशांच्या भूमिकेत बदल होवू पहात आहे. २०११ मध्ये सीरियात युध्द सुरु झाल्यापासून हजारो नागरिक अस्थिरतेमुळे स्थलांतर करीत आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसवा ओलांदे म्हणाले की, निर्वासितांच्या मोठ्या समूहाला देशात स्थान देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.आॅस्ट्रियाचा पुन्हा आखडता हात...निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्यानंतर आॅस्ट्रिया आता त्यावर बंधन आणण्याच्या विचारात आहे. हंगेरीतून युरोपात जाणाऱ्या निर्वासितांसाठी आॅस्ट्रियाने सकारात्मक पाऊल उचलले असले तरी आमच्या निर्णयावर आता बंधन आणावे लागेल असे आॅस्ट्रियाचे चान्सलर वर्नर फेमैन म्हणाले. निर्वासितांच्या सोयीसाठी काही निर्णय घेण्यात आले होते; पण त्यावर आम्हाला पुनर्विचार करावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आॅस्ट्रियातील एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हंगेरीचे पंतप्रधान विक्तोर ओर्बान यांनी आॅस्ट्रियाला आवाहन केले की, त्यांनी निर्वासितांसाठी खुल्या केलेल्या सीमा आता बंद कराव्यात. (वृत्तसंस्था)जर्मनी देणार ६ अब्ज युरोजर्मनीने निर्वासितांसाठी सहा अरब युरोची मदत आज जाहीर केली. मोठ्या संख्येने स्थलांतरित जर्मनीत प्रवेश करीत आहेत.चान्सलर एंजेला मर्केल म्हणाल्या की, निर्वासितांचे जर्मनीत होत असलेले स्वागत पाहून एक अनोखे समाधान लाभत आहे. जर्मनी आणि फ्रान्सच्या दबावानंतर युरोपीय संघ स्थलांतरितांसाठी एक कोटा तयार करीत आहे. युरोपीय आयोगाचे प्रमुख ज्यां- क्लाद जंकर यांनी १,२०,००० निर्वासितांच्या पुनर्वसनाची योजना आखली आहे.नव्या योजनेनुसार जर्मनी ३१,४४३, फ्रान्स २४,०३१, स्पेन १४,९३१ स्थलांतरितांचा स्वीकार करणार आहे.
अखेर आशेचा किरण
By admin | Published: September 08, 2015 4:05 AM