नवी दिल्ली - युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाला अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच, युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल रशियाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून (United Nations Human Rights Council) निलंबित करण्यासंदर्भातील अमेरिकेच्या प्रस्तावावर, आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) मतदान झाले. या मतदानाचा निकाल रशियाच्या बाजूने न आल्याने त्याला बेहर करण्यात आले.
रशियावर युद्धाच्या गुन्ह्याचा आरोप - अमेरिकेसह अनेक NATO देशांनी UNGA च्या मतदानात भाग घेतला. रशियावर युक्रेनमधील बुचा शहरातील नरसंहाराचाही आरोप आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी तर, बूचामध्ये युद्ध गुन्हा (War Crime) घडला असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
रशियाविरोधात आली एवढी मते - UNHRC च्या या मतदानात रशियाला बाहेर काढण्याच्या बाजूने एकूण 93 मते आली, तर 24 मते रशियाच्या समर्थनार्थ आली. दरम्यान, 58 देशांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले, अर्थात या देशांनी मतदानात भाग घेतला नाही. यात भारताचाही समावेश आहे.
भारतावर होती सर्वांची नजर -दरम्यान, बूचा नरसंहाराचा मुद्दाही चांगलाच तापलेला होता. रशिया विरोधातील हा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला होता. या मतदानादरम्यान संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या होत्या. कारण यावेळी, आता भारत कुणाच्या बाजूने मतदान करतो? अथवा भारत रशियाला पाठिंबा देतो की नाही, यावर सर्वांचे लक्ष होते. मात्र, या प्रकरणात भारताने कुणाचीही बाजू घेतली नाही, भारताने मतदानात भागच घेतला नाही.