नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट घडवून आणल्याचा मोठेपणा मिरवणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवून दिली आहे. पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला अत्यंत दुय्यम वागणूक दिल्याचं समोर आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली आणि बांगडी काढून ठेवण्यात सांगतिलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर कुलभूषण जाधव यांच्या आईला मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
'ज्याप्रकारे कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीसोबतची भेट घडवून आणण्यात आली आणि नंतर झालेल्या गोष्टी यावरुन जाधव यांच्यावरील कथित खोटे आरोप खरे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भेटीत कोणतीही विश्वासार्हता नव्हती', असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'भेटीनंतर कुलभूषण जाधव यांच्या पत्नीने वारंवार विनंती करुनही त्यांचे शूज परत करण्यात आले नाहीत'.
'सुरक्षेच्या नावे कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांना ठेस पोहोचवण्यात आली. त्यांना मंगळसुत्र, बांगड्या आणि टिकली काढण्यास सांगण्यात आलं. इतकंच नाही तर सुरक्षेसाठी आपला पोशाखही बदलण्यास सांगण्यात आलं', अशी माहिती रवीश कुमार यांनी दिली. 'कुलभूषण जाधव अत्यंत तणावाखाली असल्याचं दिसत होतं. आपल्याला खोट्या आरोपाखाली गोवण्यात आल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं. त्याच्या प्रकृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे', असं रवीश कुमार म्हणाले आहेत.
पाकिस्तानात काय घडले 25 डिसेंबरला ?हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नी चेतना व आई अवंतिका यांनी सोमवारी (25 डिसेंबर) येथे काचेआडून भेट घेतली. अटक झाल्यापासून 21 महिन्यांत जाधव यांना कुटुंबीयांनी भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीमधील एका खोलीत झालेली ही भेट म्हणजे एका परीने तोंडदेखला सोपस्कार ठरला. कारण जाधव यांना पत्नी व आईला प्रत्यक्ष भेटू दिले गेले नाही. एका काचेच्या तावदानाआडून इंटरकॉमच्या माध्यमातून त्यांना परस्परांशी संवाद साधता आला. काचेतून ते एकमेकांना पाहू शकत होते. परंतु जाधव यांना ज्या खोलीत बसविले होते ती काचेच्या तावदानाच्या पार्टिशनने सीलबंद केलेली होती. त्यामुळे बोलणे व ऐकणे फक्त इंटरकॉमवरूनच शक्य होते.
सुमारे 35 मिनिटे झालेली ही भेट संपल्यावर पाकिस्तान सरकारने तिचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यातील आवाज (ऑडिओ) बंद करून ठेवलेला होता. त्यामुळे भेटीत जाधव माय-लेकाचे व पती-पत्नीचे काय बोलणे झाले हे समजू शकले नाही. अर्थात पाकिस्तानने या भेटीची व्यवस्था ज्या पद्धतीने केली होती ती पाहता या तिघांचे इंटरकॉमवरून सुरु असलेले बोलणे त्याच वेळी (चोरून) ऐकण्याची व ते रेकॉर्ड करण्याची तजवीजही केली गेली असणार हे उघड आहे. हे बोलणे मराठीतून झाले असावे असे गृहित धरले तरी एखाद्या देशाच्या सरकारला कोणत्याही भाषेचे दुभाषे मिळणे हल्लीच्या जमान्यात कठीण नाही. भारताचे इस्लामाबादमधील उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना हजर राहू दिले जाईल, असे पाकिस्तानने आधी सांगितले होते.
परंतु भेटीच्या व्हिडिओमध्ये ते कुठे दिसले नाहीत. यावरून कदाचित त्यांना खोलीबाहेर उपस्थित राहू दिले गेले असावे असे वाटते. एखादे ‘हाय सेक्युरिटी इव्हेन्ट’ मानून कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली गेली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीकडे येणा-या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करून आसपासच्या इमारतींवर नेमबाज बंदूकधारी जवान तैनात केले गेले होते. माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या ओबी व्हॅन्सही दूर अंतरावर रोखण्यात आल्या. जाधव यांची पत्नी व आई आधी भारतीय उच्चायोगात गेल्या व तेथून त्या भेटीच्या ठिकाणी आल्या.
भेटीनंतर लगेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी पत्रकार परिषद घेऊन, पाकिस्तानचे संस्थापक काईदे-आझम मोहम्मद अली जिन्ना यांच्या जन्मदिनाचे पावित्र्य राखत शुद्ध मानवतावादी दृष्टिकोनातून ही भेट घडवून आणल्याची फुशारकी मारली. जाधव प्रकरणाचे पाकधार्जिणे असे सवंग व एकतर्फी कथानक सांगून त्यांनी ‘जाधव हे भारतीय दहशतवादाचा चेहरा’ असल्याची गरळ ओकली.
थेट भेटू न देता काचेआडून भेट का घडविली, असे विचारता डॉ. फैजल त्याचे समर्थन करत म्हणाले की, काही झाले तरी जाधव हे फाशीची शिक्षा झालेले कैदी आहेत. त्यांना भेटायला आलेल्या आमच्या पाहुण्या होत्या. त्यामुळे सुरक्षेची पुरेपूर काळजी घेणे ही आमची जबाबदारी होती. भेट अशा प्रकारे होईल याची या दोघींना आधीच कल्पना देण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले. पुन्हा केव्हा भेटू देणार, असे विचारता त्यांनी, आजची भेट शेवटची नाही, हे आवर्जून सांगितले. या पत्रकार परिषदेत जाधव यांचे दोन व्हिडीओही दाखविले गेले. त्यातील एक त्यांच्या कथित कबुलीजबाबाचा होता. दुसरा व्हिडिओ सोमवारच्या भेटीनंतरचा असल्याचे सांगितले गेले. ‘पत्नी व आईला भेटू देण्याची मी विनंती केली. ती मोठ्या मनाने मान्य केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकारचा आभारी आहे’, असे जाधव म्हणत असताना त्यात दाखविले गेले.
कॉन्स्युलर अॅसेसचा वाद
भारताने वारंवार मागणी करूनही पाकिस्तानने जाधव यांना ‘कॉन्स्युलर अॅसेस’ (राजनैतिक अधिका-याशी भेट) दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील प्रकरणात भारताने तोच मुद्दा प्रामुख्याने मांडला. भारताच्या उप उच्चायुक्तांना कुटुंबभेटीच्या वेळी हजर राहू देणे हा ‘कॉन्स्युलर अॅसेस’च आहे, या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या रविवारच्या विधानाने काही काळ वाद व संभ्रम निर्माण झाला. परंतु पत्रकार परिषदेत प्रवक्त्याने हा ‘कॉन्स्युलर अॅसेस’ नसल्याचे मान्य केले व तो केव्हा द्यायचा हे योग्य वेळी ठरविले जाईल, असे सांगितले.
थकवा, सचिंत चेहरेव्हिडीओमधील चित्रे चार कॅमे-यांनी टिपलेली होती. त्यात नेव्ही ब्ल्यू रंगाचा कोट घातलेले जाधव व अंगावर शाल पांघरलेली त्यांची पत्नी व आई हे चेह-याच्या बाजूने आलटून-पालटून दिसत होते. जाधव यांचा चेहरा थकलेला व ओढग्रस्त दिसत होता तर आई व पत्नीच्या भावमुद्रा चिंता आणि काळजीच्या होत्या. नंतर दाखविलेला जाधव यांचा आभाराचा व्हिडीओ भेटीनंतरचा असल्याचे सांगितले गेले; पण त्यात त्यांच्या अंगावर निळा कोट नव्हता. मुळात जाधव जिवंत आहेत की नाही याची शंका घेणा-यांना गप्प करणे हा व्हिडीओ दाखविण्याचा उद्देश होता. जाधव शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, असे सांगत प्रवक्त्याने त्यांचा 22 डिसेंबरचा एक मेडिकल रिपोर्टही वाचून दाखविला.