भारताला दुश्मन समजणाऱ्या आणि काही महिन्यांपूर्वी भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या तुर्कस्तानमध्ये रेसेप तैयप एर्दोगन पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. महागाई, भुकंपात पन्नास हजारहून अधिक जणांचा मृत्यू आदी पार्श्वभूमीवर एर्दोगन पुन्हा निवडून आल्याने ते पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२८ पर्यंत या पदावर राहणार आहेत.
तुर्कस्तानमध्ये २८ मे रोजी रन ऑफ राउंडमध्ये एर्दोगन यांनी बाजी मारली. त्यांना एकूण 52.1% मते मिळाली तर त्यांचे विरोधी पक्षनेते कमाल केलिकदारोग्लू यांना 47.9 % मते मिळाली. तुर्कस्तानमधील प्राणघातक भूकंपाच्या 3 महिन्यांनंतर ही निवडणूक झाली आहे.
भूकंपानंतर तुर्कस्तानमध्ये 20 वर्षे सत्तेत असलेल्या एर्दोगन यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तुर्कस्तानचे चलनही डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आहे. महागाई 40% पेक्षा अधिक आहे. असे असतानाही एर्दोगन यांना यश आले आहे. केलिकदारोग्लू यांच्याकडून त्यांना कडवी टक्कर मिळाली.
एर्दोगन 2003 पासून तुर्कीमध्ये सत्तेवर आहेत. 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. 2016 मध्ये तुर्कीमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न झाला होता. यानंतर एर्दोगन यांनी देशात सार्वमत घेऊन अध्यक्षीय पद्धत लागू केली. तेव्हापासून ते देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अशाप्रकारे गेल्या 20 वर्षात त्यांना देशाचे प्रमुख म्हणून 11व्यांदा सत्ता मिळाली आहे.