फ्लोरिडा : डब्ल्यूडब्ल्यूईच्या एका युगाचा अंत झाला. ९० च्या दशकातील बच्चेकंपनीचा लाडका ‘डेडमॅन द अंडरटेकर’ हा ‘रोमन रेन्स’सोबतच्या सामन्यात पराभव झाला आणि त्याने ‘रेसलमेनिया’चा निरोप घेतला. तो आता कधीही डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये दिसणार नाही. तब्बल २७ वर्षे मनोरंजन करून त्याने सर्वांच्या हृदयात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. रेसलमेनियाच्या ३३ व्या पर्वाचा मुख्य सामना अंडरटेकर आणि रोमम रेन्स यांच्यात झाला. रोमन रेन्सच्या प्रसिद्ध सुपरमॅन पंचसमोर अंडरटेकरने गुडघे टेकले. यापूर्वी रेसलमेनियाच्या ३० व्या पर्वात ब्रॉक लेस्नरने अंडरटेकरला हरवले होते. रेन्सकडून झालेला पराभव हा अंडरटेकरचा रेसलमेनियातील दुसरा पराभव ठरला. रेसलमेनियात तब्बल २३ सामने जिंकणाऱ्या अंडरटेकरला केवळ २ पराभवांचा सामना करावा लागला आहे. सामन्यानंतर अंडरटेकर रिंगमध्ये उभे राहण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्याची परिस्थिती नाजूक बनली होती. चाहते त्याच्या नावाचा जयघोष करीत होते. त्यांच्या डोळ्यात आसवे दाटली होती. मात्र, अंडरटेकर उठू शकला नाही. थोड्या वेळाने अंटरडेकरने हातातील ग्लोव्ज, कोट आणि टोपी उतरवून रिंगच्या मधोमध ठेवून तो रिंगमधून बाहेर पडला. त्यामुळे डब्ल्यूडब्ल्यूईच्या जगातील शहेनशहा डेडमॅनने संन्यास घेतल्याचे स्पष्ट झाले. डेडमॅन निघून जाताना प्रेक्षक एकसाथ म्हणाले, थँक्यू अंडरटेकर. अंडरटेकरने दिवे लावण्यास सांगितले. त्याने हवेत मूठ हलवून सर्वांना अभिवादन केले आणि हळूहळू तो अंधारांत नाहीसा झाला. अंडरटेकरचे खरे नाव मार्क विलिय्म कॉलावे आहे. ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’द्वारे आयोजित रेसलमेनियाचे हे ३३ वे पर्व होते. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेली ही स्पर्धा ६५ हजार लोकांनी लाईव्ह पाहिली.१९९० मध्ये अंडरटेकर डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आला होता. म्युझिक वाजल्यानंतर संपूर्ण एरिनामध्ये काळोख पसरून अचानक डेडमॅन द अंडरटेकर रिंगमध्ये उभा दिसतो. इतकी वर्षे झाल्यानंतरही अंडरटेकरची ही एन्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. मात्र, यापुढे त्याच्या या अनोख्या एन्ट्रीला प्रेक्षक मुकणार हे निश्चित.
अंडरटेकरने घेतला डब्ल्यूडब्ल्यूईचा निरोप
By admin | Published: April 04, 2017 5:19 AM