नवी दिल्ली - मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियात एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे. दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग केल्याची माहिती आहे. त्यानंतर दाऊदला उपचारासाठी कराचीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. या बातमीबाबत कुणीही अधिकृतपणे पुष्टी केली नाही.
सोशल मीडियात होत असलेल्या दाव्यानुसार, दाऊदला एका अज्ञात व्यक्तीने कराचीत विष दिले त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊद गँगच्या माजी सहकाऱ्याने याची पुष्टी करत दाऊद गंभीर अवस्थेत कराचीत हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. २ दिवसापूर्वी त्याला इथं दाखल करण्यात आल्याचे म्हटलं. दाऊदला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाऊद आहे तिथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ वरिष्ठ अधिकारी आणि निकटवर्तीयांनाच आत प्रवेश आहे.
पाकिस्तानी न्यूज चॅनेल जियो टीव्ही न्यूजने सोशल मीडियावर पसरणाऱ्या चर्चेवर म्हटलंय की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अफवा पसरत आहे. जो कथितपणे कराचीतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे. इतर स्थानिक वृत्तांनुसार, दाऊदच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं कारण अस्पष्ट आहे. कारण पाकिस्तानी आणि भारतीय अधिकाऱ्यांनी याची अधिकृत पुष्टी केली नाही. दाऊदची तब्येत अचानक खराब होण्यामागचं कारण विषप्रयोग असल्याचं बोलले जातंय. याआधीही अनेकदा दाऊद अनेक आजारांपासून ग्रस्त असल्याचा दावा करण्यात आला होता. गॅग्रींनमुळे दाऊदच्या पायाची दोन बोटे कापल्याचेही काही दिवसांपासून चर्चेत आहे.
दाऊदच्या बातमीबाबत मुंबई पोलीस त्याचे नातेवाईक अलिशाह पारकर आणि साजिद वागळेपासून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जानेवारीमध्ये दाऊदची बहीण हसीना पारकरनं तपास यंत्रणांना सांगितले होते की, दाऊद त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर कराचीमध्ये वास्तव्यात आहे. भारताचा सर्वात मोस्टवाँटेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊदवर अनेक संघटीत गुन्हे, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी यासारखे आरोप आहेत. त्याचसोबत १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता. ज्या घटनेत २५० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते.