केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५-ए हटवल्यापासून पाकिस्तानचं चित्त थाऱ्यावर नाही. काश्मीरबाबतच्या मनसुब्यांना धक्का लागल्यानं त्यांचा नुसता तीळपापड होतोय. म्हणूनच, जगभर खोटं-नाटं पसरवतं ते फिरत आहेत. पाकव्याप्त काश्मीरवर भारत हल्ला करणार असल्याचे दावे करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेत जाऊनही हेच रडगाणं गायलं. परंतु, भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे आपला टिकाव लागणार नाही, याची जाणीव आता त्यांना झाली आहे. म्हणूनच, आज संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील भाषणाआधीच त्यांनी शस्त्रं खाली ठेवल्याचं पाहायला मिळालं.
जम्मू-काश्मीरचा मुद्दा जगाने ऐकावा अशी माझी इच्छा आहे. पण मी आज जे भाषण करेन, त्याचा फारसा फायदा होणार नाही, याचीही मला कल्पना आहे, असं सूचक विधान इम्रान खान यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकांशी संवाद साधताना केलं. ते त्यांनी हार मानल्याचंच द्योतक आहे. अर्थात, संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून ते हा मुद्दा उपस्थित करतील. याआधीही त्यांनी जगाची सहानुभूती मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.
भारताने जम्मू-काश्मीरबाबत जो निर्णय घेतला तो नियमांना धरून नाही. संयुक्त राष्ट्र या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसेल तर कोण करणार?, अशी हतबलताही इम्रान खान यांनी बोलून दाखवली. याआधी, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थीची विनंती केली होती. परंतु, भारताची तयारी असेल तरच आपण मध्यस्थी करू अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आणि पाक तोंडावर पडला. हा दोन देशांमधील विषय आहे आणि पाकिस्तानने दहशतवादाला थारा देणं बंद केल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा होणार नाही, अशी ठाम भूमिका भारतानं घेतली आहे.
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं, दहशतवाद्यांना पोसत असल्याचं अनेकदा सिद्ध झाल्यानं अनेक मोठे देश भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आहेत. हे मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचं मोठं यश मानलं जातंय.
आधी मोदी बोलणार, मग इम्रान खान
दरम्यान, भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी ७.१५च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएनजीएमध्ये भाषण करतील. त्यानंतर ८ वाजण्याच्या दरम्यान इम्रान खान यांचं भाषण होईल.
संबंधित बातम्या
मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत
मोदींची पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याची तयारी; पण ट्रम्प यांच्यासमोर ठेवली एकच अट
पाकव्याप्त काश्मीरवर पुढील आठ-दहा दिवसांत भारत हल्ला करण्याची शक्यता; पाकिस्तानला धास्ती
एकीकडे भारत, दुसरीकडे इराण; माझ्या जागी दुसरा असता तर त्याला हार्ट अटॅक आला असता!