युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, पण रशियाचे हल्ले कमी होण्याचे नाव घेत नाहीत आणि युक्रेनही हार मानायला तयार नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चाही झाली असली, तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये बिकट स्थिती आहे. रशियाकडून सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे काही इमारती भग्नावस्थेत बदलल्या आहेत. तर शाळा आणि रुग्णालयांवर हल्ले होत आहेत. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हला तीन बाजूंनी वेढा घातला आहे. शिवाय रशियन सैन्य मारियुपोल आणि ब्रोवरी येथे सतत हल्ले करत आहेत.
आता दोन्ही देशांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. आज पुन्हा दोन्ही देशांमार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मुलगी फ्रान्समध्ये वास्तव्यास आहे. युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात व्यक्तींनी पुतीन यांच्या मुलीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी युक्रेनमधून फान्समध्ये आलेल्या शर्णार्थींना घरात आश्रय देण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियाने रविवारी युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३५ लोक ठार झाले असून १३४ जण जखमी झाले आहे. युक्रेनमधील ल्विव्ह येथील लष्करी तळाला लक्ष्य करून रशियाने हा हवाई हल्ला केला आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनीही ट्विटरवरून या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज १८ वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर अजूनही हल्ले सुरूच आहेत. तर दुसरीकडे युक्रेनकडूनही जोरदार प्रतिकार केला जात आहे. या युद्धात आतापर्यंत रशियाचे १३ हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे.