International News: ज्याप्रमाणे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांसाठी एक ठराविक मार्ग ठरलेला असतो, त्याप्रमाणे विमानांसाठीही एक ठरलेला हवाई मार्ग असतो. तो मार्ग सोडून इतर प्रतिबंधित क्षेत्रात विमानांना प्रवास करता येत नाही. असे केल्यास, संबंधित देशाकडून कडक कारवाई होऊ शकते. पण आता एक चकीत करणारी बातमी समोर आली आहे.
हवाई संरक्षण यंत्रणांना चकमा देत एक विमान 6 नाटो (NATO) देशांवरुन उडत गेले आहे. या घटनेमुळे अनेक देशांमध्ये खळबळ उडाली असून, लढाऊ विमानांमार्फत त्या रहस्यमयी विमानाचा पाठलाग करण्यात आला. नंतर, हे रहस्यमयी विमान एका ठिकाणी उतरल्याचे दिसले. पण विमानाची तपासणी केली असता त्यात ना पायलट होता ना कोणी प्रवासी. या घटनेने तपास पथक आश्चर्यचकित झाले.
सध्या या 'रहस्यमय विमाना'विषयी माहिती गोळा केली जात आहे. हे विमान एक-दोन नव्हे तर तब्बल सहा देशांवरुन विना परवानगी बल्गेरियात कसे पोहोचले. या मुद्द्यावर बल्गेरियन संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी ड्रॅगोमिर झाकोव्ह यांनी सांगितले की, बुधवारी (8 जून) संध्याकाळी अज्ञात विमानाने त्यांच्या देशाच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. मात्र, त्याच्यापासून कोणताही धोका नव्हता. विमान खूप कमी उंचीवर उडत होते. सध्या आमची चौकशी सुरू आहे.
6 देशांचे हवाई संरक्षण चकमाAirlive.Net च्या वृत्तानुसार, हे 'रहस्यमय विमान' हंगेरियन आणि रोमानियन हवाई दलाने बल्गेरियन सीमेत प्रवेश करण्यापूर्वी शोधले होते. यानंतर पोलंड, स्लोव्हाकिया, बल्गेरिया आणि लिथुआनियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला. NATO देशांच्या हवाई हद्दीत अनोळखी विमानांनी प्रवेश केल्यानंतर हंगेरी आणि रोमानियामधील लढाऊ विमाने (F-16) सक्रिय मोडमध्ये आली. प्रतिसाद न मिळाल्याने लढाऊ विमानांनीही त्या विमानाचा पाठलाग केला.
यानंतर अज्ञात विमान हंगेरीतील एका छोट्या विमानतळावर उतरले. येथे, अधिकारी त्याला थांबवू किंवा तपासू शकण्यापूर्वी, त्याने इंधन भरल्यानंतर पुन्हा उड्डाण केले आणि नंतर तो शेजारच्या बल्गेरियाच्या शेतात दिसले. या दोन आसनी विमानाची येथे तपासणी केली असता त्यात ना पायलट होता ना कोणी प्रवासी. या प्रकरणी, बल्गेरियाच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, विमानाने लिथुआनियाहून उड्डाण केले आणि बल्गेरियात उतरण्यापूर्वी पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि सर्बियासह सात देशांमधून गेले. यापैकी सर्बिया वगळता 6 देश नाटोचे सदस्य आहेत.