वॉशिंग्टन: आधीच कोरोनाचा जोरदार तडाखा बसलेले ऑटोमोबाइल क्षेत्र आताच्या घडीला सेमीकंडक्टर चीपचा मोठा तुटवडा सहन करत आहेत. यामुळे मोठी गैरसोय निर्माण होत असून, याचा मोठा परिणाम वाहन उत्पादन आणि वितरण यावर होत आहे. देशभरात अनेकविध कंपन्यांच्या वाहनांची मागणी वाढलेली असली, तरी सेमीकंडक्टर चीप तुटवड्यामुळे कंपन्या ती वेळेत पूर्ण करू शकत नाहीत. याचा नकारात्मक परिणाम कंपन्यावर होताना दिसत आहे. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सेमीकंडक्टर चीप निर्मात्या कंपन्यांना भारतात येऊन उत्पादन घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सेमीकंडक्टर चिपनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांची भेट घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना भारतात गुंतवणूक करून, निर्मिती सुरू करण्यासाठी आमंत्रित केले. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमधील कंपन्यांसाठी भारतात उपलब्ध संधींची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
देशाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे जागतिक केंद्र बनवणार
देशाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे जागतिक महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेसह केंद्रीय मंत्रिमंडळाने संवाहक अर्थात सेमीकंडक्टर निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्यासंबंधित उत्पादन घटकांच्या निर्मितीची श्रृंखला उभी केली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उपकरणांशी संलग्न ७६,००० कोटींच्या प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मंजुरी दिली होती. पीएलआय योजनेअंतर्गत कंपन्यांना सेमीकंडक्टर आणि डिस्प्लेशी निगडित वेफर फॅब्रिकेशन (फॅब), असेंब्ली, चाचणी आणि वेष्टन (पॅकेजिंग) सुविधेचे उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी नवीन प्रकल्पासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के, तर विद्यमान प्रकल्पाला भांडवली खर्चाच्या ३० टक्के प्रोत्साहन निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत सीतारामन यांनी सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात भारताने संशोधन आणि विकास कार्याला महत्त्व दिल्याचे सांगत ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांत देशाने उत्पादन क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले.