युद्ध संपविण्यासाठी एकत्र या, भारत तुमच्यासाेबत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:54 AM2024-08-24T05:54:17+5:302024-08-24T07:38:55+5:30
आम्ही तटस्थ नाही तर शांततेच्या बाजूने : मोदींची ग्वाही
कीव : रशिया, युक्रेनने सध्या सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर हे वक्तव्य केले. चर्चेदरम्यान दोन्ही देशांत चार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांची गळाभेट घेऊन ‘भारत कधीच तटस्थ नव्हता, तर तो नेहमीच शांततेच्या बाजूने होता,’ असे आश्वासक मत व्यक्त केले. युद्ध थांबविण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र यावे, मी भगवान गौतम बुद्धांच्या भूमीतून आलो आहे, जेथे युद्धाला स्थान नाही, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. यावेळी दोन्ही नेत्यांत व्यापार, आर्थिक, संरक्षण, औषधी, कृषी, शिक्षण आदींबाबत चर्चा झाली.
भारत युक्रेनला देणार ‘भीष्म क्यूब’
पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन सरकारला शुक्रवारी चार ‘भीष्म क्यूब’ (भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग अँड मैत्री) भेट म्हणून देण्याचे जाहीर केले. त्याद्वारे युद्धातील जखमींना तत्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत करता येणार आहे. ‘भीष्म क्यूब’ म्हणजे वाहून नेता येण्याजोगे छोटे रुग्णालय.