अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान खात्याने देशाच्या अनेक भागांत बुधवारी जोरदार पाऊस आणि पूर आल्याचे जाहीर केले. गुरुवारपासून शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. जोरदार पाऊस, गारा, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचे हवामान आणखी आठवडाभर असेच राहील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. शिवाय त्सुनामीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी पाऊस आणि पुराने वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. दुबईतील काही रस्त्यांवर (विशेषत: जेबल अली भाग) खूपच पूर आला होता, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली व कार पुराच्या पाण्यात अडकून पडू लागल्या. शेख झायेद रस्ता पाण्याने वेढला गेला होता. दुबई पोलिसांनी सांगितले की, आणीबाणीच्या परिस्थितीतील ३,२०० फोन कॉल्स आले. आम्ही सकाळी सहा ते दुपारी एक या कालावधीत वाहतुकीच्या २५३ अपघातांची नोंद केली.कार्यालयात जर कार ठेवण्यात आली असेल तर ती तेथेच ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले. शहराभोवतीच्या अनेक रस्त्यांवर पूर आला असून, मीडिया सिटी, नॉलेज व्हिलेज, जुमेईराह ३ आणि जुमेईराह १ मध्ये पूर आला आहे. हवामान केंद्राने देशात अस्थिर हवामान असेल असे म्हटले. (वृत्तसंस्था)
संयुक्त अरब अमिरातीला पावसाचा जबर फटका
By admin | Published: March 10, 2016 2:55 AM