जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 65,621,075 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,513,793 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनावर युद्ध पातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. ब्रिटनने फायझरच्या लसीला मंजुरी दिली असून पुढील आठवड्यापासून लस देण्यास सुरुवात होणार आहे. याच दरम्यान आता ब्रिटन सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना लसीमुळे एखाद्या व्यक्तीवर साईड इफेक्ट झाल्यास म्हणजेच त्याचे दुष्परिणाम जाणवल्यास सरकार त्या व्यक्तीला नुकसान भरपाई देणार आहे. 'वॅक्सिन डॅमेज पेमेंट्स स्किम' (VDPS) या योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मात्र कोरोना लसीमुळे काही साईड इफेक्ट झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर असणार, संबंधित व्यक्तिला नुकसान भरपाई कोण देणार, याबाबत चर्चा सुरू आहे. 1979 मध्ये 'वॅक्सिन डॅमेज पेमेंट्स स्किम'ची (VDPS) सुरुवात करण्यात आली. यामध्ये एखाद्या लसीमुळे साईड इफेक्ट झाल्यास सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते.
इन्फ्लुएझा, देवी, धनुर्वात आदी लसींचा समावेश करण्यात आला होता. तर 2009 मध्ये 'एच1एन1' च्या लसीचा समावेश करण्यात आला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. इंग्लंडने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ही लस लवकरच इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल.
काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. जर्मनीची बायोफार्मास्यूटिकल कंपनी बायोएनटेक आणि तिची अमेरिकन सहकारी कंपनी फायझरने युरोपिय संघासमोर लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी औपचारिक अर्ज केला होता. फायझरचे अध्यक्ष आणि सीईओ डॉ. अल्बर्ट बोरला यांनी म्हटले होते, की हा विज्ञान आणि मानवतेच्या दृष्टीने मोठा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यावरील परिक्षणाच्या निकालाच्या पहिल्या सेटवरून स्पष्ट होऊ लागले आहे, की आमची लस कोरोनाचा सामना करण्यात प्रभावी आहे. कंपनीनुसार, ट्रायलमध्ये फायझरची लस कोरोनाला रोखण्यात 90 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे.