न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाकिस्तानच्या नोंदणीकृत कंपनीच्या विमानाने प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानसाठी हा आणखी एक मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या नोंदणीकृत विमान कंपनीत कामावर असलेल्या वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव संयुक्त राष्ट्राने आपल्या कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणात बनावट परवाने आढळून आल्याप्रकरणी तपास सुरू आहे. यामुळे पाकिस्तानातील नोंदणीकृत विमान कंपन्यांमधून प्रवास करण्याबाबत इशारा दिला जात आहे, असा आशयाचे एक पत्रक संयुक्त राष्ट्र सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली यांच्याकडून काढण्यात आले आहे.
कोणाला लागू असणार निर्देश?
संयुक्त राष्ट्राने दिलेले निर्देश पाकिस्तान कार्यरत असणाऱ्या संयुक्त राष्ट्राशी निगडीत सर्व संस्था, यूएन डेव्हलपमेंट प्रोग्राम, जागतिक आरोग्य संघटना, यूएन शरणार्थी उच्चायोग, खाद्य आणि कृषी संघटना, यूएन शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संघटना आदी सर्वांवर लागू असणार आहेत. या निर्देशांनंतर पाकिस्तानात काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पाकिस्तानातील नोंदणीकृत विमानाने प्रवास करण्याला मनाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
४० टक्के वैमानिकांकडे बनावट परवाने!
गतवर्षी कराची येथे झालेल्या विमान अपघातानंतर पाकिस्तानातील वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. एवढेच नव्हे, तर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (PIA) ४० टक्के वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याचा आरोप पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी केला होता.