ढाका- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने राखिन प्रांतामध्ये लष्कराद्वारे होणारी कारवाई आणि रोहिंग्यांवरील अत्याचार थांबविण्यासाठी दबाव वाढवल्यावर म्यानमारने आता नवी भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्राने पाठवलेल्या या निवेदनामुळे पळून गेलेल्या 6 लाख रोहिंग्यांबद्दल बांगलादेशाशी चालू असलेल्या चर्चेवर परिणाम होईल अशी सूचक प्रतिक्रिया म्यानमारतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये सुरु असलेली लष्करी मोहीम आणि राखिन प्रांतात रोहिंग्यावर होणारे अत्याचार ही अत्यंत काळजीची बाब असल्याचे मत सुरक्षा परिषदेच्या निवेदनामध्ये व्यक्त झाले आहे. यावर म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांनी हा प्रश्न म्यानमार आणि बांगलादेश यांच्यामधील द्वीपक्षीय संबंधातूनच सोडवला जाऊ शकतो, हा त्यांचा मुद्दा सुरक्षा परिषदेत दुर्लक्षित राहिल्याचे मत व्यक्त केले आहे. सू की यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये सुरक्षा परिषदेच्या कालच्या भूमिकेमुळे सध्या गतीमान आणि सुरळीत असणाऱ्या बांगलादेश आणि म्यानमारमधील चर्चेवर परिणाम होऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अबुल हसन महमूद अली 16 आणि 17 नोव्हेंबर असे दोन दिवस रोहिंग्यांच्या प्रश्नावरील चर्चेसाठी म्यानमारला जाणार आहेत. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसनदेखिल 15 नोव्हेंबर रोजी म्यानमार दौऱ्यावर जाणार आहेत.