ऑनलाइन लोकमत
सॅन होजे, दि. २८ - संयुक्त राष्ट्राने अद्याप दहशतवादाची नेमकी व्याख्या स्पष्ट केलेली नाही, ऐवढ्या वर्षानंतरही संयुक्त राष्ट्र व्याख्या ठरवत नसेल तर या समस्येशी सामना कसा करणार असा सवाल उपस्थित करत संयुक्त राष्ट्राने दहशतवादाबद्दलची त्यांची भूमिका, ते कोणाला दहशतवादी मानतात आणि कोणाला मानवतावादी समजतात हे त्यांनी स्पष्ट करावे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
अमेरिका दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सॅन हॉजे येथे भारतीयांशी संवाद साधला. मी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून आता तुमच्याकडून मला माझ्या कामाचे प्रमाणपत्र हवे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. भारतात नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नेहमीच होतात, पण माझ्यावर अद्याप एकही आरोप झालेला नाही असा दावा त्यांनी केला.मुलाने २५० कोटी कमावले, मुलीने ५०० कोटी, जावयाने हजार कोटी कमावले अशा बातम्या ऐकू येत होत्या, देशातील जनता भ्रष्टाचाराला कंटाळली होती असेही मोदींनी नमूद केले. ग्लॉबल वॉर्मिंग व दहशतवाद या जगासमोरच्या दोन प्रमुख समस्या आहेत, दहशतवादात चांगला व वाईट दहशतवाद अशी विभागणी होऊ शकत नाही, दहशतवाद हा दहशतवादच असतो असेही त्यांनी म्हटले आहे.