इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकाही एक्शन मोडमध्ये आली आहे. इस्रायलला युद्धात सतत मदत करणाऱ्या अमेरिकेने सीरियातील इराण समर्थक गटांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. युद्धाच्या काळात अमेरिकेचं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. कारण, इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या हमासला आर्थिक मदत केल्याचा आणि इतर मार्गाने मदत केल्याचा आरोप इराणवर सातत्याने होत आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितलं की, सीरियातील अल्बु कमाल आणि मयादीन या शहरांमध्ये हवाई हल्ला करण्यात आला. इराण समर्थक मिलिशिया सीरियातील दीर अल जोर प्रांतातील अल्बु कमाल या पश्चिम भागात दहशतवादी छावणी चालवत होते. येथेच हा हल्ला करण्यात आला. याशिवाय दुसरा हल्ला मयादिन शहराजवळील एका पुलाजवळ करण्यात आला. या हल्ल्याचे आदेश थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिल्याचंही ऑस्टिन यांनी म्हटलं आहे.
एजन्सीच्या मते, सीरिया आणि इराकमधील इराण समर्थक मिलिशियावर अमेरिकेचा हा तिसरा मोठा हल्ला आहे. या भागात दहशतवाद्यांचे ड्रोन आणि रॉकेट हल्ले कमी करण्याच्या प्रयत्नात अमेरिका गुंतलेली आहे. कारण इथे दहशतवादी संघटना छोटे छोटे हल्ले करून अमेरिकन लष्कराचं मोठं नुकसान करत असतात. इराण-समर्थित मिलिशिया गटांचा असा विश्वास आहे की, इस्रायलने हमासवर वेगाने केलेल्या हवाई हल्ल्याला अमेरिका जबाबदार आहे.
49 हल्ल्यात 45 अमेरिकन सैनिक गंभीर जखमी
गेल्या काही आठवड्यांत इराण-समर्थित मिलिशियांनी इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर सुमारे 49 हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये सुमारे 45 अमेरिकन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. सीरियामध्ये सुमारे 900 अमेरिकन सैनिक तैनात आहेत आणि इराकमध्ये 2,500 हून अधिक सैनिक तैनात आहेत. मोठा भाग ताब्यात घेतल्यानंतर इस्लामिक स्टेटचा पराभव झाला तेव्हा ते तैनात करण्यात आले होते. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना या भागात इस्लामिक स्टेटला पुन्हा वाढण्यापासून रोखायचं आहे.