वॉशिंग्टन -अमेरिकेतील ओहायो राज्यातील वॉरेन काऊंटी भागात सध्या ३ ते १४ वर्षे वयाची १४५ मुले न्यूमोनिया तापाने फणफणली आहेत. या तापाची लागण इतक्या मुलांना होण्याचा प्रकार सध्या ओहायो वगळता अमेरिकेत अन्यत्र कुठेही आढळलेला नाही असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अमेरिकेत असा ताप येण्याच्या घटनेला चीन जबाबदार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्याला अमेरिकी सरकारने दुजोरा दिलेला नाही. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, तापाने फणफणलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. या मुलांपैकी बहुतांश जण घरी राहूनच उपचार घेत आहेत. चीनमधून कोरोनासारख्या साथीचा जगभरात फैलाव झाल्याचा अनुभव सर्वांना आला आहे. त्यामुळे चीनमधील न्यूमोनियाचा जर फैलाव झाला असेल तर त्याची बायडेन सरकारने दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी ओहायोतील नागरिकांनी केली.
आमच्यामुळे काहीही घडलेले नाही - चीनचीनमध्ये विविध प्रांतांमध्ये सध्या बालकांना काही आजारांनी पछाडले आहे. त्या घटनेचा हवाला देऊन नेटकऱ्यांनी अमेरिकेतील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहाण्याची विनंती केली आहे. मात्र चीनमध्ये लहान मुलांना ज्ञात विषाणूंपासून आजार झाले आहेत असा दावा चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेतील ओहायो राज्यात गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून न्यूमोनियाने तापाने धुमाकूळ घातला आहे.