अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून घिरट्या घालत असलेल्या चीनच्या हेरगिरी बलूनला पाडण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा आदेश मिळताच अमेरिकन हवाई दलाच्या हाय-टेक F-22 रॅप्टर एअरक्राफ्टच्या मदतीनं चीनच्या बलूनला पाडण्यात आलं. बलूनला पाडण्यासाठी सिंगल साइडविंगर मिसाइल डागण्यात आली. बलूनच्या अवशेषांमुळे कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून अमेरिकेनं हे बलून दक्षिण कॅरोलिनाच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास ९.८ किमी दूरवर अटलांटिक महासागरामध्ये शूट डाऊन केलं आहे. चीनच्या हेरगिरी 'बलून'ला अमेरिकेनं पाडलं, बायडन यांच्या आदेशानंतर कारवाई; पाहा Video
अमेरिकेच्या या कारवाईमुळे चीनचा तीळपापड झाला आहे. बलून पाडल्याचं वृत्त समोर येताच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. "आम्हाला हा मुद्दा शांतीपूर्ण पद्धतीनं हाताळायचा होता. पण अमेरिकेनं आमचं सिविलियन एअरशिप (हेरगिरी बलून) पाडलं आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. अमेरिकेनं या कारवाईमधून आंतरराष्ट्रीय मानकांचं उल्लंघन केलं आहे. चीन आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. आम्ही याआधी अमेरिकेसोबत याबाबत अनेकदा चर्चा केली. सिविलियन एअरशिप चुकून अमेरिकेच्या हवाईहद्दीत गेल्याचं आम्ही सांगितलं होतं. हा एक फक्त अपघात होता. अमेरिकेच्या सैन्याला या बलूनचा कोणताही धोका नव्हता हे आम्ही याआधीही सांगितलं होतं", असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
बायडन नेमकं काय म्हणाले?चीनचं गुप्तहेर बलून पाडण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही आपली भूमिका मांडली आहे. "मला ज्यावेळी चीनच्या या बलून विषयी माहिती मिळाली. मी तात्काळ संरक्षण मंत्रालयाला ते पाडण्यासाठीचे आदेश दिले होते. पण तो पाडताना त्याच्या अवशेषांमुळे जमिनीवर नागरिकांना कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागली. त्यामुळे जोवर बलून सागरी क्षेत्रात जात नाही तोवर ते पाडता आलं नाही", असं ज्यो बायडन म्हणाले.
अमेरिकेचं लक्ष्य आता या बलूनचे अवशेष रिकव्हर करण्याकडे आहे. अमेरिकन पथकं घटनास्थळावर पोहोचली आहेत आणि यात एफबीआय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अमेरिकेनं या मिशनसाठी काही मानवविरहीत विमानांनाही तैनात केलं आहे.
अमेरिकेनं पाडलेला एअर बलून आहे तरी काय?यूएस, कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेच्या एअरस्पेसमध्ये चीनचा संशयास्पद बलून आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. अमेरिकेनं जाहीर केलेल्या माहितीनुसार, मोंटाना येथे आकाशात आढळून आलेल्या या बलूनचा आकार तीन बसेस इतका होता. पण या स्पाय बलूनमुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं अमेरिकेनं संरक्षण विभागानं जाहीर केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन हवाई क्षेत्रात असलेल्या या बलूनवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात होतं. अमेरिकन सैन्याच्या विमानांकडून बलूनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं गेलं. यातच बायडन यांनी बलून पाडण्याचे आदेश दिले आणि आदेशाचं पालन करत अमेरिकन सैन्यानं कारवाई करत बलूनला समुद्रात यशस्वीरित्या पाडलं आहे.