इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनलेले असताना अमेरिकेने दक्षिण आशियातील ‘पारंपरिक व सामरिक संतुलन’ बिघडेल असे काही करू नये, असे स्पष्ट मत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी व्यक्त केले आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ २० आॅक्टोबरपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा करणार आहेत. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला चाप लावण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरताज अजीज यांचे हे वक्तव्य आले आहे.बीबीसीच्या उर्दू सेवेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सरताज अजीज म्हणाले की, अमेरिकेने भारताशी हवे तसे संबंध ठेवावेत; पण भारत-पाकिस्तानात तणाव असताना दक्षिण आशियाई या दोन देशांतील ‘पारंपरिक व सामरिक संतुलन’ बिघडेल असे काही करू नये. अण्वस्त्रांच्या मुद्यावर अमेरिकेशी चर्चा करताना पाकिस्तान तडजोड करणार नाही, असे सूचित करून ते म्हणाले की, राष्ट्रहित आणि सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे मूळ धोरण आहे. या धोरणाला आम्ही चिकटून राहू.
‘सामरिक संतुलन’ अमेरिकेने बिघडवू नये
By admin | Published: October 18, 2015 10:13 PM