बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिकी नौदलाची क्षेपणास्त्र विनाशक मार्गदर्शकप्रणाली सज्ज युद्धनौका वादग्रस्त दक्षिण चीन सागरी हद्दीत शिरल्याने चीनचा तिळपापड झाला असून पुन्हा असा अगोचरपणा न करण्याचा, तसेच अशा चिथावणीकारक कृतीला कणखरपणे उत्तर दिले जाईल, असा इशारा चीनने दिला आहे.दक्षिण चीन सागरातील सुबी आणि मिश्चिफ द्वीपसमूहाभोवती चीनने कृत्रिम बेट उभारले आहे. या बेटानजीकच्या वादग्रस्त सागरी हद्दीतील १२ नाविक मैल हद्दीवर चीनचा दावा आहे. याच वादग्रस्त सागरी हद्दीत अमेरिकेने ही युद्धनौका पाठवून चीनच्या या वादग्रस्त दाव्यालाच आव्हान दिले आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाने अमेरिकेची ही कृती बेकायदेशीर असल्याचे सांगत कोणत्याही देशाच्या अशा चिथावणीकारक कृतीला चोख उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.या सागरी हद्दीत जलमय झालेल्या प्रवाळाचे रूपांतर चीनने २०१३ मध्ये एका कृत्रिम बेटात केले होते. अमेरिकी युद्धनौकेची ही घुसखोरी बेकायदेशीर असल्याचे चीनने म्हटले आहे. गेल्या महिन्यात वॉशिंग्टन येथे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चर्चा केली होती. या बेटाचे लष्करीकरण करण्याचा चीनचा हेतू नाही, असे जिनपिंग यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. परंतु अमेरिकेचे असे म्हणणे आहे की, लष्करी तळ उभारून चीन या भागावर कब्जा करू पाहत आहे.संयुक्त राष्ट्राच्या सागरी हद्द करारानुसार अमेरिकेने जलवाहतूक स्वातंत्र्य कार्यक्रम तयार केला आहे. तथापि, संयुक्त राष्ट्राच्या सागरी हद्द कराराला अमेरिकेने संमती दिलेली नाही. यूएसएस लासेन (गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर) या युद्धनौकेपाठोपाठ अमेरिकी नौदलाचे पी-८-ए आणि पी-३ विमान या भागात टेहळणीसाठी पाठविली जाणार आहेत, असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या भागात येत्या काही दिवसांत अमेरिका गस्त वाढविणार आहे. २०१३ आणि २०१४ मध्ये अमेरिकेने चीन, मलेशिया, फिलीपीन्स, तैवान आणि व्हिएतनामविरुद्ध विविध प्रकारे जलवाहतूक स्वातंत्र्याची मोहीम राबविली होती. (वृत्तसंस्था)
अमेरिकेची युद्धनौका वादग्रस्त भागात शिरल्याने चीनचा तिळपापड
By admin | Published: October 27, 2015 11:38 PM