संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला अमेरिका आणि ब्रिटनने पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आजच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकेल यासाठी ती अधिक समावेशक बनवण्याची मागणी केली. तर दुसरीकडे “जागतिक स्तरावर भारताचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. ब्रिटनला त्याचा आर्थिक प्रभाव यासह जागतिक स्तरावर सक्रिय भूमिका बजावताना पाहायचं आहे,” अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरली यांनी दिली.
बायडेन यांनी भारतासह जपान आणि जर्मनीला कायमस्वरूपी सदस्य बनविण्याबाबत वक्तव्य केलं. विटोचा वापर केवळ विशेष किंवा अपवादात्मक परिस्थितीतच केला पाहिजे, जेणेकरून सुरक्षा परिषदेची विश्वासार्हता आणि प्रभाव कायम राहील. सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांनी विटोचा वापर टाळावा, असंही ते म्हणाले.
बदल होत राहिले पाहिजे“संयुक्त राष्ट्रांसारख्या दीर्घकालीन संस्थांनी त्यांचे भविष्य प्रभावशाली बनवण्यासाठी स्वत:मध्ये बदल करत राहणं आवश्यक आहे,” असे क्लेवरली यांनी सांगितले. भूतकाळाप्रमाणे भविष्यही प्रभावशाली असावं यासाठी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आणि महत्त्वपूर्ण संस्थांप्रमाणे संयुक्त राष्ट्रालाही आपल्यात योग्य बदल करणं आवश्यक असल्याचंही बुधवारी यूएन जनरल असेंब्लीच्या उच्चस्तरीय सत्रानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं.
मोदी प्रभावीपणे मत मांडतात - क्लेवरलीपंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर अतिशय प्रभावीपणे मत व्यक्त करतात, असं क्लेवरली म्हणाले. रशियन नेतृत्वही जागतिक स्तरावर भारताच्या स्थितीचा सन्मान करतं. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी मोदींनी हे युग युद्धाचं नसल्याचं म्हटलं होतं. यावरही क्लेवरली यांनी प्रतिक्रिया दिली.
भारतानं उचललेलं हे पाऊल स्वागतार्ह आहे. शांतता आणि तणाव कमी करण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या आवाजावर पुतीन लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. यासाठी आम्ही पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत असल्याचंही ते म्हणाले.