संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या (United Nation General Assembly) 76 व्या सत्रात सहभागी होण्यासाठी सर्व देशांचे प्रमुख अमेरिकेत दाखल झाले आहेत. दरम्यान, ब्राझीलचे (Brazil)राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांचा अमेरिकेतील एक फोटो समोर आला आहे, जो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या फोटोमध्ये जायर बोल्सोनारो फुटपाथवर उभे राहून पिझ्झा खाताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल फोटोमध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फुटपाथवर पिझ्झा खाताना दिसून येत आहेत. हा फोटो पाहून लोकांच्या मनात प्रश्न उद्भवला आहे की, संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत आलेल्या एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या मागे असे काय कारण असू शकते, ज्यामुळे ते रस्त्याच्या बाजूला उभे राहून अशा प्रकारे पिझ्झा खात आहेत.
दरम्यान, यामागील कारण आहे कोरोना लस. अमेरिकेतील हॉटेल्स/रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना लस घेतल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्हाला हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, कारण त्यांच्याकडे कोरोना लसीकरणाचा कोणत्याच पुरावा नव्हता.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही. त्यांचे म्हणणे आहे की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी मजबूत आहे. दरम्यान, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या शिष्टमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्र्यांनी रविवारी रात्री न्यूयॉर्कच्या फुटपाथवरील सहकाऱ्यांसह एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो देखील पिझ्झा खात होते.